Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

6 Ramachandra Maathi

६. श्रीमद् रामचंद्र तीर्थ

दीक्षागुरु : श्री अणुजीवोत्तमतीर्थ (५)
संन्यास दीक्षा : श्रीशके १५४९ प्रभव सं॥ कार्तीक शु. ९मी बुधवार (१७/११/१६२७)
शिष्य स्वीकार : श्री दिग्विजयरामचंद्रतीर्थ (७)
महा निर्वाण : श्रीशके १५८७ विश्वावसु सं॥ वैशख व.३य, शनिवार ०२/०५/१६६५
वृंदावन स्थळ : श्री मारुती मंदिर रिवण
शिष्यपीठावर काळ : १० वर्षे १३ दिवस
गुरु पीठावर काळ : २७ वर्षे ०५ महिने २४ दिवस
मठ सेवा काळ : ३७ वर्षे ०६ महिने ०९ दिवस
मठस्थापना : १ श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, पर्तगाळी.
: २ श्री मारुती मंदिर, रिवण.

स्वामीजींचा इतिहास

श्रीरामचंद्रवैदेहीससौमित्रिहनुमताम् । लब्धारमनिशं वन्दे रामचंद्रयतीश्वरम् ॥
पीठाचे सहावे आचार्य श्रीमद् रामचंद्रतीर्थ हे श्रीमद् अणुजीवोत्तमतीर्थांचे शिष्य. यांना त्यांच्या गुरुकडून गोकर्ण येथे शके १५४९ प्रभव संवत्सर, कार्तिक शुध्द ९ ला आश्रम मिळाला. शके १५६० मध्ये श्रीमद् अणुजीवोत्तमतीर्थ समाधिस्थ झाल्यावर लगेच त्यांस पट्टाभिषेक झाला आणि पुढे २७ वर्षे त्यांनी संस्थानचा कारभार केला, संस्थानाविषयी लोकात आदर व प्रेम उत्पन्न केले आणि गोव्यातील पर्तगाळी गांवी मठ बांधला. पर्तगाळी गावात गोकर्ण मठाचे पुढल्या काळात जे स्थलांतर झाले ते केवळ या मठाच्या इतिहासातच नव्हे तर एकूण सारस्वत ब्राह्मणांतील वैष्णव सांप्रदायिकांच्या इतिहासात एक फार मोठी महत्त्वाची आणि मर्यादित अर्थाने युगप्रवर्तक अशी घटना मानावी लागते, या योगायोगाने वैष्णव सांप्रदायिकांची मठ स्थापना पर्तगाळी गावात झाली ही गोष्ट खरीच आहे. योगायोग घडला तो असा – श्रीमद् रामचंद्रतीर्थ स्वामीस गोकर्ण मठाच्या माघल्या डोंगराच्या शिलागर्भात आकस्मिकपणे चार शिलामूर्ती सांपडल्या. श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमंत यांच्या त्या मूर्ती होत्या. या मूर्तीचे काय करावे अशा विचार करत असतानाच स्वामीजींस स्वप्नात एक दृष्टांत झाला. “या मूर्ती घेऊन उत्तर दिशेने जा. जिथे मूर्तिवाहकाना त्या मूर्ति जड होतील, तिथे त्याची स्थापना करा" असा तो दृष्टांत होता. श्रीमद् रामचंद्रतीर्थ चारही मूर्ती घेऊन मग सपरिवार उत्तर दिशेने मार्गक्रमण करूं लागले. काळी नदी ओलांडून ते अलीकडे आले. माशे गांवावरून पैंगीण गावात आले, आणि तिथे शिलामूर्ती जड झाल्या. अर्थात या ठिकाणी त्यांची स्थापना करायची. पण जिथे मूर्ती जड झाल्या ती जागा मंदिर वा मठ स्थापनेच्या दृष्टीने गैरसोयीची होती. मुख्य म्हणजे पाण्याची सोय नव्हती. काय करावे याची आचार्यांना चिंता पडली. त्याच रात्री स्वामीजींना पुन्हा दृष्टांत झाला. "उद्या सकाळी एक गाय येईल. तिची पूजा करून तिला योग्य जागा दाखविण्याची विनंती करा. ती मार्गदर्शन करील, जिथे ती दुग्धधारा सोडील तिथे पुन्हा शिलामूर्ती जड होतील. जड झालेल्या शिलामूर्तीची त्या ठिकाणी स्थापना करा." दृष्टांताप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी एक कामधेनू दिसली. तिची पूजा करून स्वामीजींनी तिला विनंती केली. गाय पूर्व दिशेच्या रानावनातून चालू लागली. मागून स्वामीजी मूर्तींसह मंडळी निघाली. कुशावती नदीच्या काठी एका रम्य परिसरात पोचताच गायीने दुधाची धार सोडली. श्रीराम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती जड झाल्या. या तिन्ही मूर्तीची स्थापना याच ठिकाणी करण्याचा संकल्प श्रीमद् रामचंद्रतीर्थांनी केला आणि पुन्हा गाय चालू लागली. तशीच रानावनांतून, डोंगर-दऱ्या तुडवीत. अडचणीच्या वाटेने मार्गक्रमण करीत आचार्यासह काही मंडळी गायीच्या पाठोपाठ निघाली. ऋषिवन किंवा आजच्या रिवण या गावात येऊन गाय उभी राहिली. तिने पुन्हा पान्हा सोडला. श्री मारुतिची मूर्ती जड झाली. श्री मारुती स्थापनेसाठी जागा निश्चित झाली. या दोन्ही ठिकाणी आचार्यांनी मंदिरे व मठ बांधून त्या त्या मूर्तींची स्थापना केली. ज्या काळी पर्तगाळची मठस्थापना झाली त्या काळात काणकोण उर्फ शिवेश्वर महाल हा सौंदेकर राजाच्या ताब्यात होता. सौंदे हा कर्नाटकाच्या आजच्या उत्तरकन्नड जिल्याचा शिरसीजवळचा एक गाव असून विजयनगर कालापासून इथले राज घराणे अस्तित्वात होते. त्यांची सत्ता गोव्यातील फोंडे महालापासून मंगळूर पर्यंत चालू होती. प्रथम विजयनगरचे व नंतर विजापूरकरांचे मांडलिक म्हणून ते कारभार पाहात. इ.स. १६५६ मध्ये पर्तगाळीला मठस्थापना झाली. पुढे पर्तगाळ मठात रामनवमीचा उत्सव सुरू झाला तेव्हा या उत्सवासाठी लागणाऱ्या सामानाची व्यवस्था एका वेगळ्या प्रकारे केली. काणकोण महालांतील काही गांवावर 'सामानकर' नावाचा एक कर बसविला. प्रत्येक गांवाने उत्सवाला लागणारे विशिष्ट सामान पुरवावे असा हुकूम दिला. ग्रामस्थांनी या 'करा'चे स्वागत करून ते या उत्सवात सहभागी होऊ लागले. श्रीमद् रामचंद्रतीर्थानी हा मठ स्थापन केला तरी ते गोकर्ण येथील मठात अधिक वास्तव्य करीत. गोव्यातील संचाराचे वेळी व रामनवमीप्रीत्यर्थ पर्तगाळी मठात ते येत. परंतु त्यांनी रिवण येथे जो मठ बांधून मारुतिची मूर्ती स्थापन केली होती. तिथे मात्र त्यांचा बराच काळ मुक्काम असे. श्रीरामाप्रमाणेच ते मारुतिचेही उपासक होते. श्रीमद् रामचंद्रतीर्थांचा मोक्ष ऋषिवन या नांवाने त्याकाळी ओळखल्या जात असलेल्या आजच्या रिवण येथे त्यांनीच स्थापन केलेल्या उपमठात शके १५८७ मध्ये वैशाख वद्य तृतीयेला झाला. यांच्या कारकिर्दीतील अस्सल कागदपत्र उपलब्ध आहेत.