Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

1 Varanasi Marathi

श्री लक्ष्मीनारायण मंदिर वाराणसि

माधवजीका दरारा, के २२/२९ पंचगंगा घाट, वाराणसि २२१००१, फोन ०५४२-२४०४४१९

संस्थापक : श्री नारायण तीर्थ (१)
स्थापना वर्ष : शालिवाहन शके १३९७ मन्मथ संवत्सर (इ.स. १४७५) कार्तिक पौर्णिमा (२२/११/१४७५)
देवप्रतिमा : श्री लक्ष्मीनारायण (धातूची मूर्ती)
बिल्टप क्षेत्र : २२० चौरस मीटर (जमिनी + २ मजले)
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अर्चक निवास, गुरु भवन, खोल्या, हॉल, ओपन टेरेस.

कार्तिक महिन्यांतीलच गोष्ट. राजकन्या आपल्या सख्या व दासीसमवेत गंगास्नानाला आली. अंगावरचे मौल्यवान अलंकार उतरून नदी किनारी वस्त्रांवर ठेवले. नेहमीचाच तो रिवाज. राजकन्येने गंगापात्रात डुबकी घेतली आणि तिच्या अंगांत हुडहुडी भरली. लगबगीने किनाऱ्यावरील कोरडे वस्त्र ओढून तिने अंगावरची ओली वस्त्रे सोडली. हळूहळू सारी मंडळी स्नान आटोपून राजवाड्यात परतायची तयारी करताना लक्षात आले की राजकन्येची वज्रजडित बांगडी हरवली आहे. नुकतीच काढून ठेवलेली बांगडी जाणार कुठे? शोधाशोध सुरू झाली. भर दिवसा राजकन्येची बज्रजडित बांगडी चोरण्याचे साहस करवले तरी कोणा ? घाटाच्या एका कोपऱ्यात एक संन्यासी जपानुष्ठानाला बसलेला दिसला. अनेकांनी या परदेशस्थ संन्याशाला तेथे पाहिले होते. राजकन्येचा अलंकार हरवल्यामुळे मोठा कोलाहल झाला तरी श्रीनारायणतीर्थांच्या ध्यानांत व्यत्यय आला नाही. शिपायांनी येऊन त्यांच्या ध्यानाचा भंग केला आणि राजकन्येच्या हरवलेल्या बांगडीची माहिती देऊन त्या परदेशी संन्याशावर वहीम असल्याचे बोलून दाखविले. “सर्वसंग परित्याग करून संन्यास व्रताचा स्वीकार केलेल्या आम्हा संन्याशांना धन-अलंकाराचे प्रलोभन असण्याचे कारणच नाही. जेथे आम्ही दोन प्रहरच्या घासाची पर्वा करीत नसतो, तेथे स्वीकृत असंग्रह व अस्तेय व्रताशी द्रोह करून संन्यास धर्माशी प्रतारणा कां बरे करणार?” श्रीनारायणतीर्थ यत्किंचितही विचलित झाले नाहीत. पण त्यांची प्रांजळ भाषा शिपायांना समजली नाही व त्यांनी संन्याशाची झडती घेतली. झडतीत काही सांपडले नाही तेव्हा शिपाई हिरमुसले. श्रीनारायणतीर्थांच्या निरपराधित्वाबद्दल संदेह राहिला नाही. प्रवाहाचे पाणी निवळल्यावर गंगापात्रांत शोध घेतला व बांगडी सांपडली. राजघराण्यातील मंडळीने श्री नारायणतीर्थांची माफी मागितली. एका निरपराध संन्याशाशी राजसत्तेने आगळीक केली ही गोष्ट काशी नरेशांच्या कानावर गेली. या प्रमादाचे प्रायश्चित घेतले पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले व ते पंचगंगा घाटावर येऊन श्री नारायणतीर्थां समोर नतमस्तक झाले. “जे घडले त्या प्रकारामुळे आम्ही लज्जित झालो आहोत. स्वामीजींनी आम्हाला क्षमा करावी.” काशी नरेशाने प्रार्थना केली. श्री नारायणतीर्थ म्हणाले, "तुमच्या राज्यात धर्म व धार्मिकतेला नेहमी उदार - आश्रय मिळत आलेला आहे. या पंचगंगा घाटाजवळ गंगामातेने प्रवाहाची दिशा बदलून ती ईशान्यप्लवा झाली आहे. आम्ही सदूर अपरांत प्रांतातील गौड सारस्वत ब्राह्मण, पण आमच्या मनात काशी क्षेत्रातील गंगामैंयाबद्दल आकंठ भक्ति भरलेली आहे. आमच्या समाजाचे लोक अधिकाधिक संख्येने या ठिकाणी पोचावे, जगन्मातेचे त्यांना दर्शन घडावे, ईशान्यप्लवा प्रवाहामध्ये पुण्यस्नान करण्याचे भाग्य त्यांना मिळावे यासाठी एक मठवास्तु उभी करावी अशी आमची मनोकामना आहे. याकामी नरेशांनी आस्था दाखविली तर ते एक पुण्यकार्य ठरू शकेल." पश्चात्तापदग्ध झालेल्या काशी नरेशांना श्री नारायणतीर्थांच्या उद्गारांनी दिलासा मिळाला. त्याच घाटावर बिंदुमाधव मंदिराच्या सन्मुख ईशान्यप्लवा गंगेच्या तीरावर एक मठ उभा झाला आणि त्या ठिकाणी पंचधातुमय श्री लक्ष्मीनारायणाच्या प्रतिमेची विधिवत् - प्रतिष्ठापना करून श्री नारायणतीर्थांनी नित्य पूजाअर्चेची व्यवस्था केली आणि काशीहून ते परतले. सारस्वत ब्राह्मण वैष्णव परंपरेतील हा पहिला मठ होय. ही घटना शके १३९७ मन्मथ संवत्सरात (१४७५ एडि )घडलि आहे. मठाचे नववे गुरुवर्य श्रीमद् लक्ष्मीनारायण तीर्थांनी इ.-स. १६९५ साली या मठाचे नूतनीकरण केले. नूतनीकरणासाठी स्वामिमहाराजांनी यामठांत तब्बल ८ वर्षे वास्तव्य केले. श्री लक्ष्मीनाथ तीर्थ, श्री द्वारकानाथ तीर्थ तसेच श्री विद्याधिराज तीर्थ या गुरुवर्यांनी टप्या टप्यानी मठाचे नूतनीकरण केले.