
श्री पद्मनाभतीर्थ
जन्मस्थळ : होन्नावर
जन्मनाम : नारयण वेंकटेश भट्ट
जन्मतिथी : श्रीशके १७५० सर्वधारी संवत्सर श्रावण शुक्ल २या मंगळवार (१२/०८/१८२८)
संन्यासदीक्षा : श्रीशके १७६१ विकारी संवत्सर माघ शुक्ल ५मी शनिवार (०८/०२/१८४०)
दीक्षास्थळ : श्री जीवोत्तम मठ गोकर्ण
दीक्षागुरु : श्री पूर्णप्रज्ञ तीर्थ (१८)
गुरुपीठारोहण : श्रीशके १८०१ प्रमादी संवत्सर ज्येष्ठ शुक्ल १४ मंगळवार (०३/०६/१८७९)
शिष्यस्वीकार : श्री इंदिराकांत तीर्थ (२०)
महानिर्वाण : श्री शके १८१४ नंदन संवत्सर आषाढ शुक्ल ७मी (०१/०७/१८९२)
वृंदावन स्थळ : पर्तगाळी मठ
शिष्यकालावधी : ३९ वर्ष १३ महिने २७ दिवस
गुरुपीठकालावधी : १२ वर्ष ०९ महिने २९ दिवस
मठसेवाकालावधी : ५२ वर्ष ०५ महिने २४ दिवस
आयुर्मान : ६३ वर्ष १० महिने २९ दिवस
परंपरेचे एकोणीसावे आचार्य श्री पद्मनाभतीर्थ यांचा जन्म शके १७५०सर्वधरी संवत्सर श्रावण शुक्ल २या होन्नावरात झाला. वडिल बंधुचे नांव वेंकटेश भट. शके १७६१ विकारी संवत्सर माघ शु. ५ मीला त्यांना गोकर्ण मठांत आश्रमदीक्षा देण्यात आली. गुरु विव्दान होते व स्वतः विद्यार्थ्यांना पाठ देत होते. त्यामुळे श्रीपद्मनाभतीर्थांचे शिक्षण खुद्द श्रीपूर्णप्रज्ञतीर्थ स्वामींच्या देखरेखीखाली झाले. मुख्यतः श्रीमदाचार्यकृत ब्रह्मसूत्रांवरील भाष्य, न्याय, व्याकरण, तर्क आदी विषयांचा त्यांचा व्यासंग झाला. गुरूंप्रमाणेच त्यांनीही तीर्थयात्रा केल्या. तिरुपती, धनुष्कोडी, अनंतक्षेत्र (त्रिवेंद्रम), मंजेश्वर, उडुपी, बसरूर, गोकर्ण वगैरे ठिकाणी यात्रा करणे हा या पीठावरील आचार्यांचा जणू एक नियम होता व तो पद्मनाभ तीर्थांनीही पाळला.
गुरुप्रमाणेच शिष्यही दीर्घायुषी झाले. गुरुशिष्याची ही जोडी एकमेकांस इतकी पूरक होती की गुरू यात्रेसाठी किंवा संचारासाठी मठाबाहेर पडले तरी मठाच्या व्यवस्थेत किंवा कारभारात काहीही उणीव रहात नसे. सर्व प्रकारची नित्य कर्मे तर सुरळीतपणे चालतच पण नैमित्तिक कामेही बिनबोभाटपणे होत. गुरूंचा संपूर्ण विश्वास व आशीर्वाद त्यांनी मिळविला होता. म्हणूनच मठाच्या हिताच्या दृष्टीने शिष्यांनी जो जो कारभार केला त्याला गुरूंची संमती मिळाली.
वर मठाच्या मालकी हक्काबाबतचे ते सरकारी प्रकरण दिले आहे त्यांत प्रमुख भाग पद्मनाभ तीर्थांचाच होता आणि शेवटचा निवाडा पोर्तुगालाहून आला तेव्हा तर तेच पीठावर होते. श्रीपूर्णप्रज्ञतीर्थांचे त्यावेळी निर्वाण झाले होते.
श्री पद्मनाभतीर्थ कालकिर्दींतील जे अनेक कागद दप्तरांत उपलब्ध आहेत त्यपैकी बहुसंख्य कागद हे व्यवहारांतील देण्याघेण्या संबधीचे, जमीन विकत घेण्या संबधीचे, सरकारांत कांही कब्जे मांडण्यासाठी दिलेल्या अधिकारपत्रांचे आहेत. या आचार्यानी संस्थानाला अनेक जमिनी मिळवून दिल्या व त्याचे उत्पन्नही वाढविले.
श्री पद्मनाभतीर्थ ह्यांचे निर्वाण शके १८१४ नंदन संवत्सर आषाढ शु.७ पर्तगाळीत झाले. त्यांचे वृंदावन पर्तगाळी मठांत आहे.
न्यायव्याकरणभिज्ञां मध्वसिद्धान्ततत्परम् ।
पद्मनाभगुरुं वन्दे मध्वसिद्धान्तलब्धये ॥