
श्री विद्याधिराज तीर्थ
जन्मस्थळ : श्री दामोदर निलय, नायकनकट्टे बैंदुर तालूका उडुपि जिल्हा.
जन्मनाम : सेनापूर राघवेंद्र लक्ष्मीनारायण आचार्य
जन्मतिथी : श्रीशके १८६७ पार्थीव संवत्सर श्रावण शुक्ल १४शी बुधवार (२२/०८/१९४५)
संन्यासदीक्षा : श्री शके १८८८ पराभव संवत्सर माघ कृष्ण २या रविवार (२६/०२/१९६७)
संन्यास दीक्षा वयोमान २१ वर्ष ०६ महिने ०४ दिवस
दीक्षास्थळ : श्री राममंदिर वडाला मुंबई
दीक्षागुरु : श्री द्वारकानाथ तीर्थ (२२)
गुरुपीठारोहण : श्रीशके १८९५ प्रमाथीच संवत्सर चैत्र शुक्ल २या (०५/०४/१९७३)
शिष्यस्वीकार : श्री विद्याधीश तीर्थ (२४)
महानिर्वाण : श्रीशके १९४३ प्लव संवत्सर आषाढ शुक्ल १०मी सोमवार (१९/०७/२०२१)
वृंदावन स्थळ : पर्तगाळी मठ
शिष्यकालावधी : ०६ वर्ष ०१ महिने १० दिवस
गुरुपीठकालावधी : ४८ वर्ष ०३ महिने १४ दिवस
मठसेवाकालावधी : ५४ वर्ष ०४ महिने २३ दिवस
आयुर्मान : ७५ वर्ष १० महिने २७ दिवस
मठस्थापना : १. कायंकुळम (केरळा) १९७६
२. बदरिकाश्रम २८/०६/१९८९
३. बेळगावि १८/०५/१९९०
४. दांडेली २६/०३/१९९२
५. मडगांव १९/११/१९९३
६. हुब्बळ्ळी ३०/११/१९९६
७. पर्वरी १८/११/२०००
८. कंडलुरु ०३/०३/२००२
९. नसिक ०४/०४/२००२
१० भद्रावति १४/११/२००३
स्थळांतरपूर्वक नूतन मठवास्तु स्थापना
यल्लापुर ०८/०४/१९८३
मंकी मठ ०१/०६/१९८३
परंपरेचे बाविसावे आचार्य श्रीमत् व्दारकानाथतीर्थ स्वामी यांचे शिष्य श्रीविद्याधिराजतीर्थ हे गंगोळी येथील सेनापूर लक्ष्मीनारायणाचार्य व त्यांच्या पत्नी सौ. श्रीमतीबाई यांचे व्दितीय सुपुत्र. पूर्वाश्रमीचे नांव राघवेंद्र आचार्य. श्री व्दारकानाथतीर्थ स्वामींचे पूर्वाश्रमीचे पुतणे. त्यांना संस्थानच्या मुंबई येथील वडाळा मठात शके १८८८, माघ वद्य २, दि. २६ फेब्रुवारी १९६७ या दिवशी मोठ्या थाटाने संन्यास दीक्षा देण्यात आली.
शिष्यस्वामी निवडण्याची मठाची एक परंपरागत पद्धत आहे. त्या पध्दतीनुसार ही निवड करण्यात आली होती. प्रथम गुरुस्वामींनी पाच संभाव्य बटूंची शिष्यस्वामीसाठी निवड केली व त्यांच्या जज्मपत्रिका गोळा करून त्या काही ज्योतिर्विदांच्या स्वाधीन केल्या. या ज्योतिषपंडितांना स्वामीजींनी मुद्दाम मठात पाचारण करून आणले होते. त्यांच्या स्वाधीन फक्त पत्रिकाच दिल्या होत्या. त्या पत्रिका कोणाच्या आहेत हे पंडितांना सांगितले नव्हते.
ज्योतिषशास्त्रज्ञांनी पांचही कुंडल्यांचा अभ्यास करून संन्यासाश्रमासाठी सर्वांत योग्य अशा एका पत्रिकेची निवड करुन ती श्रीव्दारकानाथतीर्थ स्वामींच्या स्वाधीन केली व मग श्रीस्वामींनी ती राघवेंद्र आचार्य या बटूची असल्याचे सांगितले. याप्रसंगी स्ववर्गीय अनेक शिष्यमंडळी उपस्थित होती. त्यांनी या घटनेचे स्वागत केले. नंतर बटूच्या मातापित्याकडे काही सद्गृहस्थांचे एक शिष्टमंडळ पाठविण्यात आले व घडलेली हकीकत या मंडळीनी लक्ष्मीनारायण आचार्यास निवेदन केली. त्यांनी व त्यांच्या पत्नीने नियत कर्तव्यावर लक्ष देऊन बटूला शिष्याश्रम स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानंतर ही वार्ता सर्वत्र पसरली व बटूच्या निवडीबद्दल सर्वानी समाधान व्यक्त केले. नंतर वर सांगितल्याप्रमाणे वडाळा मठात त्यांस श्री शके १८८८ पराभव संवत्सर माघ कृष्ण २या रविवार (२६/०२/१९६७) आश्रम देण्यात येऊन त्यांचे आश्रमातील नाव श्रीविद्याधिराजतीर्थ असे ठेवण्यात आले.
गुरुस्वामींचा सहवास शिष्यस्वामींना पूर्ण सहा वर्षांचा काळ लाभला. या काळात गुरुस्वामीनी आपल्या शिष्याच्या अध्ययनाकडे संपूर्ण लक्ष दिले, इतकेच नव्हे तर त्यांची दृष्टी अधिक विशाल व्हावी, ती समाजाभिमुख व्हावी, आधुनिक विद्या व शास्त्राचे त्यास ज्ञान व्हावे तसेच अध्यात्म, तत्वज्ञान, वेदवेदांत वगैरे शास्त्रातही ते पारंगत व्हावे याबद्दल प्रयत्न केले. स्वतःबरोबर त्यास सर्वत्र हिंडविले. मुळातच श्रीविद्याधिराजतीर्थ यांस कानडी व इंग्रजी शिक्षणाचा लाभ झाला होताच. कोंकणी ही मातृभाषा होती. मराठी व हिंदी भाषांचे ज्ञानही त्यांनी मग संपादन केले. या विविध भाषांच्या अभ्यासामुळे श्रीविद्याधिराजतीर्थ स्वामी अनेक भाषांत बोलू शकतात. फक्त बोलू शकतात असे नव्हे तर उत्कृष्ट वक्तृत्व करतात. पट्टाभिषेक समारंभानंतर त्यांचे जे आशीर्वादपर भाषण झाले ते भाषण त्यांचे पहिले जाहीर भाषण होते. पण त्या भाषणाने अनेकांनी या स्वामीजींपाशी वक्तृत्वाचे गुण असल्याचे उद्गार काढले व ते खरेही होते.
श्रीव्दारकानाथतीर्थ स्वामींचे २५ मार्च १९७३ रोजी आकस्मिक निर्वाण झाले. त्यानंतर बारा दिवसांनी शके १८९५ चैत्र शुद्ध २, दि. ५ एप्रिल १९७३ रोजी शिष्यस्वामीस पट्टाभिषेक करण्यात आला. सर्व गोव्यातून, मुंबईहून आणि दोन्ही कॅनरा जिल्ह्यातून असंख्य शिष्यवर्ग त्या दिवशी पर्तगाळी मठात गोळा झाला होता. स्वामीजींचे पहिले जाहीर भाषण झाले ते याचवेळी. श्रीविद्याधिराजस्वामींनी अनारोग्य असतानाही मठाच्या कारभारात गुरुप्रमाणेच खूप लक्ष घातले. माणसे जोडण्याची कला त्यांच्या अंगात होती. सामाजिक कार्यात पुढाकार होता. पट्टाभिषेक ग्रहणानंतर त्यांचा जाहीर कार्यक्रम झाला तो खांडोळे येथील श्रीगणपती मंदिराच्या सभामंडपाच्या उद्घाटनाचा. याहीवेळी त्यांची लोकसंग्रहाची वृत्ती दिसून आली. गोव्याचे मुख्यमंत्री कै. दयानंद बांदोडकर यांच्याशी ते जेवढे अगत्याने बोलले तेच अगत्य त्यांनी सर्वसामान्य लोकांविषयीही दाखविले.
श्रीविद्याधिराजतीर्थ १९७३ साली ज्या तिथीला श्रीगुरुपीठावर आले तो दिवस योगायोगाने श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या संस्थापनेचा दिवस होता. पांच शतके पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीमठाला तोवर बावीस पुण्यवंत स्वामीजींची अखंड परंपरा लाभली होती. श्रीविद्याधिराजतीर्थ हे परंपरेतील तेविसावे स्वामी.
श्रीगुरुपीठावर येतांच त्यांनी श्रीमठसंस्थापनेचा पंचशताब्दि महोत्सव साजरा करण्याचा संकल्प जाहीर केला. पण कारकिर्दीचा शुभारंभ त्यांनी वारणासी क्षेत्रांतील श्रीसंस्थानच्या आद्य मठाच्या जीर्णोध्दाराद्वारे केला व श्रीगुरुपीठारोहणाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत (१९९८) त्यांनी दुर्लभ अशी शिलाक्षेत्राची (दामोदरकुंड) यात्रा करून वास्को (गोवा) येथे भव्य नूतन मठवास्तू बांधली.
१९ मार्च १९९९ (चैत्र शुक्ल द्वितीया, शके १९२१) रोजी तीन टप्प्यांनी जीर्णोध्दार व विस्तार करण्यात आलेल्या अतिभव्य अशा पर्तगाळ येथील मुख्य मठाच्या वास्तूचे विधिवत् उद्घाटन केले. गेल्या ४८ वर्षांत श्रीस्वामीजींनी जेवढे कार्य केले तेवढे यापूर्वीच्या पांचशे वर्षांत होऊ शकले नव्हते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. श्रीस्वामीजींनी जे जे संकल्प केले ते सारे पूर्णत्वास नेले. अशा कार्यामध्ये जुन्या मठवास्तूंचे जीर्णोध्दार व विस्तार, सारस्वत समाजाच्या नव्या वसाहती स्थापन झाल्या तेथे नूतन मठवास्तूंची बांधणी, श्रीमठाच्या कक्षेतील देवमंदिरांची डागडुजी व त्या मंदिरांमध्ये नूतन विग्रहांची प्रतिष्ठापना, यज्ञयाग व अनुष्ठानांद्वारे धर्म व धार्मिकतेच्या क्षेत्राचा विस्तार, ठिकठिकाणी चातुर्मास्य व्रताचरण करून त्या त्या परिसरांतील समाजवृंदामध्ये कुलदेव व गुरुपीठांतील श्रध्दा दृढतर केल्या, संन्यस्त जीवनाची सारी व्रते कर्तव्यनिष्ठेने पाळून आपली वैयक्तिक अध्यात्म साधना व स्वाध्यायरूपी ज्ञानार्जनाचा महायज्ञ अखंड चालू ठेवला.
विसावे शतक शेवटच्या टप्प्यांत पोचत असताना श्रीस्वामीजी श्रीगुरुपीठावर आले व श्रीमठाचा पाया अधिक दृढ व व्यापक करून, समाज अधिक संघटित व उन्नत बनवून एकविसाव्या शतकाची संभाव्य आव्हाने पेलण्याची शक्ति समाजात विकसित केली. दोन शतकांमधील दुवा बनताना परंपरेशी फारकत येऊ न देता जे कार्य त्यांनी केले त्या कार्याचा विस्तृत आढावा इतिहास घेईलच.
पीठावर आल्यापासून सामाजिक व सांस्कृतिक, त्याचप्रमाणे धार्मिक कार्याचा व्याप सतत विस्तारत राहिला तरी पूज्य स्वामीजीनी आपली स्वाध्याय साधना अखंड चालू ठेवली. या साधनेचा कळस म्हणजे कल्याणपूर येथे सुरू केलेल्या श्रीमन्न्यायसुधा पाठाची त्याच ठिकाणी १९९८ मध्ये केलेली यशस्वी परिपूर्ति होय.
पर्तगाळ मठांतील जीवोत्तम वैदिक पाठशाळेची गुणवत्ता वाढवून शिस्तबध्द अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वेद, संस्कृत, धर्मशास्त्र, ज्योतिष आदि विषयांचे क्रमबद्ध शिक्षण दिले जाते. या पाठशाळेतून दरवर्षी सुमारे पन्नास विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत असतात. पांच वर्षांच्या अभ्यासक्रमाचे हे गुरुकूल देशभर ख्याती मिळवून बसले.
मठक्षेत्राच्या पलीकडे जाऊन समाजाचे प्रश्न व त्यांची दुःखे ओळखून ती दूर करण्यासाठी दोन धर्मादाय विश्वस्त मंडळांची स्थापना केलेली आहे. स्वामी द्वारकानाथ विश्वस्त मंडळ व श्री विद्याधिराज धर्मादाय विश्वस्त मंडळ ही ती मंडळे होत. शिक्षण, आरोग्य, सामाजिक संस्कार इत्यादि क्षेत्रात ही मंडळे समाजाला सहाय्य करीत आहेत. - गेल्या ४८ वर्षांत जी धार्मिक होमहवनें मठानुयायी वर्गाकडून स्थानिक देवदेवतांच्या सान्निध्यांत पूज्य स्वामीजींच्या उपस्थितीत पार पडली. त्यामध्ये सहस्रकुंभ, महाविष्णु, अतिविष्णु, महासुदर्शन, अतिरुद्र, शतकोटी रामनाम, महारुद्र, शतचंडी, रक्षात्रय हवन आदि यज्ञांचा समावेश आहे.
श्री विद्याधिराजतीर्थांनी केलेले मठ जीर्णोध्दार
वारणासी (१९७५),
बसरूर, कारवार, वेंकटापूर (१९७९),
गोकर्ण (१९८१),
भटकळ (१९८१),
पर्तगाळ मुख्यमठ (१९९९)
६. अंकोला (१९८८),
७. मंगळूर (नवग्रह प्रतिष्ठा) (१९९१)
८. गंगोळ्ळी (१९८८)
९. बेंगळूर येथील लहानशा मठवास्तूचे भव्य वास्तूंत रूपांतर (१९८५),
१०. वास्को येथे छोटेखानी मठवास्तु शेजारी बहुमजली भव्य वास्तु (१९९८)
जुन्या मठांत कल्याण मंडपांची उभारणी
(१) भटकळ (श्रीनारायणतीर्थ कल्याण मंडप) - १९८१,
(२) मंगळूर (श्रीद्वारकानाथ भवन) -१९८२,
(३) रिवण (श्रीरामचंद्रतीर्थ मंडप)- १९८४,
(४) गंगोळ्ळी (श्रीद्वारकानाथतीर्थ सभागृह)- १९८४,
(५) बेंगळूरु (श्रीविद्याधिराज सभागृह) - १९८५,
(६) अंकोला (श्रीविद्याधिराज सभागृह)- १९८९,
(७) डिचोली (श्रीअणुजीवोत्तमतीर्थ मंडप)- १९९६,
(८) कारवार (श्रीइन्दिराकान्त सभागृह)-२००१.
मठ परंपरेतील यतिवर्यांच्या बहुतेक साऱ्या वृंदावनांचे जीर्णोध्दार श्री विद्याधिराजतीर्थ स्वामीजींनी आपल्या कारकीर्दीत केले. पूज्य विद्याधिराजतीर्थ स्वामीजींकडून अनेक देवालयांमध्ये नूतन विग्रह प्रतिष्ठा कार्य झाले.