Taking too long? Close loading screen.
PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

श्री लक्ष्मीनाथ तीर्थ

जन्मस्थळ : मुर्डेश्वर
जन्मतिथी : श्रीशके १७१५ प्रमादीच संवत्सर चैत्र शुक्ल २या बुधवार (१३-०३-१७९३)
संन्यासदीक्षा : श्री शके १७२६ रक्ताक्षी संवत्सर चैत्र शुक्ल ८मी मंगळवार (१७-०४-१८०४)
दीक्षास्थळ : श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान वेंकटापुर
दीक्षागुरु : श्री रमानाथ तीर्थ (१५)
गुरुपीठारोहण : श्री शके १७२६ रक्ताक्षी संवत्सर चैत्र शुक्ल ९मी बुधवार (१८-०४-१८०४)
शिष्यस्वीकार : श्री आनन्द् तीर्थ (१७)
महानिर्वाण : श्रीशके १७४३ वृष संवत्सर मार्गशीर्ष कृष्ण ९मी सोमवार (१७-१२-१८२१)
वृंदावन स्थळ : बडोदा
शिष्यकालावधी : १ दिवस
गुरुपीठकालावधी : १७ वर्ष ०७ महिने २९ दिवस
मठसेवाकालावधी : १७ वर्ष ०७ महिने २९ दिवस
आयुर्मान : २८ वर्ष ०९ महिने ०४ दिवस
मठस्थापना : श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान वेंकटापुर (श्री शके १७३९ ईश्वर सं॥ ज्येष्ट शु. ३या
(१९-०५-१८१७)
अलौकीक कार्य : बडोदेच्या राजाला मंत्रफलानी संतान अनुग्रह.
मठ जीर्णोद्धार : गोकर्ण मठ संपूर्ण जीर्णोद्धार, मठा समोर मारुति घूडाची स्थापना.

परंपरेचे सोळावे आचार्य श्रीलक्ष्मीनाथतीर्थ यांस वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी श्रीरमानाथतीर्थ (१५) यांनी निर्वाण समयी व्यंकटापूर मठात संन्यास दीक्षा दिली आणी शके १७२६ अधिक चैत्र शु. ९ ते समाधिस्थ होऊन त्यांचे शिष्य श्री लक्ष्मीनाथतीर्थ यांस पट्टाभिषेक झाला.
श्रीलक्ष्मीनाथतीर्थाना ११ व्या वर्षी आश्रम देण्यात आला त्यानंतर पांच-सहा वर्षे त्यांचे शिक्षण झाले, आणि वयाच्या अवघ्या एकूणतीसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. यावरून त्यांच्या ऐन कर्तबगारीची फक्त अठरा वर्षे उरतात. या एवढ्या मुदतीत त्यांनी संचार केला. तीर्थयात्रा केल्या. पण त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य झाले ते म्हणजे गोकर्ण मठाची पुन्हा उभारणी. परंपरेचे तिसरे स्वामी श्रीजीवोत्तमतीर्थ यांनी गोकर्ण येथे नरसू केणीने दिलेल्या जुन्या मठाचे रूपान्तर करून गोकर्ण मठाची मुहूर्त मेढ रोवली. सहावे आचार्य श्रीरामचंद्रतीर्थ यांनी मूळ मठाचा जीर्णोध्दार केला होता आणि श्रीलक्ष्मीनाथतीर्थ यांनी आज आहे त्या नवीन मठाचा जीर्णोध्दार करून मठासमोर मारुतीचे ध्वजगोपूरही उभारले. तेराव्या परंपरेचे श्रीकांततीर्थ यांनी या मठाच्या जीर्णोध्दाराचा काही प्रयत्न केला होता असे पत्रव्यवहारातून दिसते परंतु तो यशस्वी झाला नाही. परंपरेतील जुन्या भटकल, बस्रुर, अंकोला व अवर्सा मठांचा पूर्ण जीर्णोद्धार त्यांच्या कारकीर्दित घडलेला आहे.
श्री लक्ष्मीनाथतीर्थ यांनी काही यात्रा केल्याचे लेखी कागदपत्रांवरून कळून येते. शके १७४० मध्ये ते संचाराला बाहेर पडले तेव्हा कुंभकोणमच्या सुजनेंद्रतीर्थ स्वामींनी आपल्या शिष्यवर्गाला रायस पाठवून त्यांचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करून सर्व प्रकारचे सहाय द्यावे असे कळविले आहे.
या आचार्यानी तिरुपती, रामेश्वर वगैरे दक्षिणेकडील यात्रा केली. पंढरपुरास जाऊन विठोबाचे दर्शन घेतले आणि ते उत्तरेच्या यात्रेला गेले. ही यात्रा करताना त्यांनी भागीरथीचे स्नान केल्याचा उल्लेख आहे. ते बडोद्याला गेले. या गोष्टीला कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे. याची माहिती देण्यापूर्वी स्वामीजींनी बडोद्याच्या राजावर अनुग्रह करून त्यास पुत्र संतानाची प्राप्ती करून दिल्याची जी एक कथा असे आहे की, श्री लक्ष्मीकांत तीर्थ तीर्थयात्रेस फिरत असताना शके १७४३ मार्गशीर्ष शुक्ल ६ला बडोद्यास पोचले त्यावेळी तेथील राजाने आपल्या भार्येसह त्यांची अत्यादराने भेट घेतली व त्यांची पाद्यपूजा केली. त्या राजदांपत्यास पुत्रसंतान नसल्यामुळे त्यांनी आपली पुत्रकामना दर्शविली. श्रीस्वामींनी त्यांस पुत्रप्राप्तीसाठी एक फळ अभिमंत्रण करून दिले. ते त्या दांपत्याने सेवन केले आणि पुत्रप्राप्तीची प्रचीती आल्यानंतर श्रीस्वामींनी तेथून निघावे अशी त्या दांपत्यांने विनंती केली. ती विनंती मान्य करून श्रीस्वामीनी बडोद्यांत वास्तव्य केले नंतर राजास पुत्रप्राप्ती झाली आणि श्रीस्वामी त्या राजघराण्याचे एक दैवत होऊन बसले.
त्याकाळात बडोद्यात वास्तव्यास असलेला गणपत् रामचंद्र नावाच्या ग्रहस्थांनी मुंबईला राहाणारे आपले आप्त अनंत भांडारी यांस शके १७४३ मार्गशीर्ष कृ. ९मी दिवशी म्हणजे स्वामीना मोक्षप्राप्त झाला त्यास दिवशी एक पत्र पाठविले असून त्यांस मार्गशीर्ष शुद्ध ६ रोजी श्रीस्वामी बडोध्यांत आले व एक पंदरवड्या नंतर वद्य ९ला समाधिस्त झाले असे म्हटले आहे. या पत्राचि नक्कल दप्तरात उपलब्द असून मजकूर खालील प्रमाणे लिहलेला आहे.
अपत्य गणपत रामचंद्र वागळे सा. न. विज्ञापना तागायेत मार्गशिर्ष वद्य ९मी पावेत सर्व मंडळी सुखरूप असो, विशेष आपण्याकडील बहूत दिवस झाले पत्र येवून वर्तमान कळू येत नाही. त्यात निरंतर पत्र पाठवून संतोषवित जावे, तेणेकरून चित्ताचे समाधान होत जाईल. येथे श्री लक्ष्मीनाथतीर्थ स्वामी मार्गशीर्ष शुद्ध ६ शुक्रवारी बडोदा मुक्कामि सायंकाळी आले. त्या दिवशी ज्वराने बहूत हैराण जाहले व औषधी उपाय बहूत प्रकारचे केले परंतू काही गुणास न आले. पुढे जायाचा बेत ठरविता येथे राहून घेतले, नंतर मर्गशिर्ष वद्य ९मी सोमवारी दोन प्रहरी समाधीस्थ जाहले. ईश्वरीसत्तेफुडे उपाय नाही. त्यांचे देवतार्चन सामान वगैरे येथून थोडक्या दिवशी बंदोबस्ताने रवानगि करितो.
बडोद्याहून वागळे यांचे पत्र आल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे पौष शुध प्रतिपदा शके १७४३ या दिवशी अनंत केशव भांडारी यांनी पर्तगाळी येथे श्री आनंद तीर्थ स्वामी यांस पत्र लिहून हे दुःखद वर्तमान कळविले. श्री लक्ष्मीनाथतीर्थ स्वामींनी बडोदे येथे शके १७४३ वृष संवत्सर मार्गशीर्ष वद्य ९ तिथी समाधी घेतली.

यो बडोदामहाराजं सत्पुत्रमकरोच्छितम् ।
लक्ष्मीनाथगुरुर्मेऽस्तु स मनोभीष्टदः स्तुतः ॥