१४ श्रीभूविजय रामचंद्रतीर्थ
दीक्षागुरु : श्री श्रीकांत तीर्थ (१३)
शिष्यस्वीकार : श्री रमानाथ तीर्थ (१५)
महानिर्वाण : श्रीशके १७२५ रुदिरोद्गारी संवत्सर मार्गशिर्ष शुक्ल ९मी बुधवार (२३-११-१८०३)
वृंदावन स्थळ : श्री वीरविट्ठल मठ अंकोला
गुरुपीठकालावधी : १७ वर्ष ०४ महिने १९ दिवस
मठस्थापना : १ यल्लापुर् मठ (१७९० सुमारे)
२ अवर्सा मठ श्रीशके १८२२ रौद्र माघ शुक्ल ५मी (१९-०१-१८०१)
स्वामीजींचा इतिहास
व्यासराजमठाधीशलक्ष्मीनाथयतिप्रियम् ।
भूत्यै भूविजयं रामचन्द्रयोगीन्द्रमाश्रये ॥
एकूण दप्तरांतील कागदपत्र पाहता श्रीभूविजय रामचंद्रतीर्थाच्या कारकीर्दीचा काल हा शके १७०० ते १७२५ असावा असे म्हणता येते. चौदाव्या परंपरेचे हे आचार्य श्री श्रीकांततीर्थांचे शिष्य होत. यांना पर्तगाळ मठात आश्रमदीक्षा देण्यात आली. शके १७०० पासून त्यांची पीठाधिपती म्हणून कारकीर्द चालू होती असे म्हटले त्याचे कारण असे की मठाच्या दप्तरात संस्थानासाठी भूविजयरामचंद्रतीर्थानी शके १७०० साली नगर्से येथील दोन व १७०३ वर्षी एक अशा तीन जमिनी विकत घेतल्याची नोंद आहे.
शके १७२० या वर्षी श्री भूविजयरामचंद्र तीर्थ यात्रेला गेल्याचा उल्लेख एका पत्रात आढळतो. तिरुपती, रामेश्वर, म्हैसूर, करीत पोडनूरला आले. तेथील राजाने बहूत सन्मान केला, कुंभकोणमच्या स्वामींची भेट झाली, मागांविद देशस्थ यांनीही बहुमान देशोदेशी करून रवाना केला. शिर्शी गांवी गेल्यावेळी तेथील स्ववर्गीय लोकांनी स्वामींचे थाटाने स्वागत केले, हे वर्तमान तेथील कर्नाटक देशस्थ श्रीव्यासराजमठ प्रवर्तक श्रीलक्ष्मीनाथतीर्थ स्वामींस ऐकून फार आनंद झाला. आणी त्या स्वामींनी गौड सारस्वत ब्राम्हणांतर्गत वेंकप्पा यामार्फात आपला पारपत्यगार वेंकळ कृष्णाचार्य व काही आपले अनुयायी यांस पाठऊन श्री भूविजयरामचंद्र तीर्थांस आपल्या मठांत येण्याचा आग्रह केला, आणी त्यांस आपल्या मठांत आणून उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा करून काश्मिरी शालाजोडी अर्पण केली. नंतर श्री भूवीजय रामचंद्र तीर्थांनी श्रीलक्ष्मीनाथ तीर्थांस आपल्या मठात बोलवून आदरयुक्त तसाच सत्कार केला. ही हकीकत स्वतः स्वामीजींनी एका पत्रांत शिष्य श्री रमानाथ तीर्थ यांना कळविली आहे.
खुद श्री भूविजयरामचंद्र तीर्थानीही शके १७२३ अधिक पौष शु. १५ या दिवशी आपल्या शिष्य वर्गास लिहिलेल्या पत्रात आपण कुठे कुठे यात्रा केली, वाटेत काय अनुभव आले, कंपनी सरकारच्या राज्यांत आपला छत्र, चामर पालखी ई. सरंजाम वापरण्यास अधिकाऱ्यांनी कशी बंदी केली, पूर्वी हैदर आणी टिपुच्या अमलांतसुद्धा ती कशी नव्हती, नंतर हि बंदी अधिकाऱ्यांनी कशी उठविली, तिकडच्या द्रवीड ब्राम्हाणांनी कसे कुचोद्य केले, लिंगायतांनी कसा उपद्रव दिला, वगैरे सर्व हकीकत कळवून पुढे सूचना दिली आहे. “तर तुह्मी मुंबईचे महाराजे श्री इंग्रज जनरल यांस पुरातन चालत आल्या प्रमाणे कंपनिच्या राज्यांत येता जातां बहुमान पुरस्सर चालेसारिखे दिवाणाचे पत्र त्यांचे कपितांव व कर्नल यांस हुकूम लिहून घेऊन पाठवावा”.
शके १७१३ च्या पौष वद्य पंचमीस पेशव्यांचे कर्नाटकाचे सुभेदार यांना आदेश दिला आहे. यावेळी पुण्याला सवाई मधवरावांची करकीर्द चालू आसून नाना पडणवीस कारभारी होते. सदाशिवगड, कूर्मगड किल्ले, व आजूबाजूचा प्रदेश मराठ्यां कडे होता. गंगाधर गोविंद यांच्या सहिचा परवाना आला त्यास “परमहंस श्रीपाद भूविजय रामचंद्र तीर्थ स्वामी हे पर्तगाळीहून कर्नाटक प्रांती येणारे त्यांस जाऊ देणे” असा चौकीदारांस हुकूम दिलेला आहे.
या घटनेप्रमाणेच आणखी एक भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची घटना याच आचार्यांच्या कारकीर्दीत घडली, ती मराठ्यांचा शेवटाचा व ब्रिटिशांचा उदयकाल ही होय. सन १७९६ मध्ये दुसरा बाजीराव गादीवर आला. १८०० वर्षी नाना फडणीस मृत्यू पावला आणि मग पेशवाई विनाशकालाच्या गर्तेत झपाट्याने उतरू लागली. श्री रामचंद्रतीर्थांची कारकीर्द शके १७२५ पर्यंत चालू असावी (सन १८०३) साली त्यांची कारकीर्द संपली. त्याच्यापूर्वी तीन वर्षे नाना फडणीसांच्या रुपाने मराठेशाहीचे शहाणपण संपले होते आणि ती विनाशाकडे झपाट्याने वाटचाल करू लागली होती. याचा परिणाम इंग्रजशाहीची पाळेमुळे भारतभर विस्तारली. दक्षिणेत टिपूचा पराभव झाल्यामुळे इंग्रजांकडे कर्नाटक आले आणि त्याचा परिणाम पर्तगाळी मठ पोर्तुगीजांच्या राज्यांत आणि दक्षिणेतील गोकर्ण, भटकळादि मठ, इतकेच नव्हे तर श्रीमन्मध्वाचार्याचे उडुपीचे अष्टमठही इंग्रजांच्या राज्यात गेले. या गोष्टी भूविजय रामचंद्रतीर्थांच्या काळात घडल्या.
यानंतर श्रीरामचंद्रतीर्थांनी भाद्रपद, शु. १५ शके १७२४ रोजी काशी, प्रयाग, नर्मदातीर, गोदातीर, जगन्नाथपुरी, मुंबई, राजापूर, शहापूर, खानापूर, गोमंतक पासून दक्षिणेस उत्तर व कानडा जिल्हे आणि कोची, तलचेरी, तिरुपती, रामेश्वरा पर्यंतच्या सर्व स्वकीय शिष्यवर्गास एक रायस पाठवून कळविले आहे की “विद्यानगर कर्नाटक सिंहासनाधीश्वर संस्थानधिपती श्री लक्ष्मीनाथतीर्थ श्रीपाद' यांचा आमचा गुरुपरंपरारभ्य स्नेह संबंध असून ते व्दिग्विजयासाठी आपल्या प्रांती संचारार्थ गेले तर त्यांचे ठायी भक्तिप्रीतीपूर्वक आदर करून परामर्ष घ्यावा. त्यांच्या मठात हल्लीच चोरी झाली आहे, तर अनुकूलतेनुसार द्रव्यसहाय्य करावे."
श्री भूविजयरामचंद्रतीर्थ यांच्या नावाचे शेवटचे पत्र उपलब्ध आहे ते ज्येष्ठ कृ. ९ शके १७२५ चे कानडीत लिहिलेले.
त्यानंतरच्या काळांत श्री भूविजयरामचंद्रतीर्थांचा पत्रव्यवहार उपलब्ध नाही. वर उल्लेख केलेल्या ज्येष्ठ कृष्ण नवमीच्या कानडी पत्रानंतरचे फक्त पंधरवड्याने लिहिलेले जे पत्र उपलब्ध आहे ते आषाढ शु. ८ शके १७२५ चे मुक्काम ताळगाव पणजी प्रांत घेथून कांही ग्रामण्य विषयक प्रकरणाविषयी वेंकटेश म्हामाई व इतर बारा गृहस्थांनी श्री रमानाथतीर्थ यांना उद्देशून लिहिलेले.
अंकोला मठांत शके १७२५ रुधिरोद्घारी संवत्सर मार्गशीर्ष शु. ९ ला श्री भूविजयरामचंद्र् तीर्थांनी समाधी घेतली. यांची समाधी अंकोला मठात आहे.