Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

श्री रमानाथ तीर्थ

जन्मस्थळ : काणकोण तालूक्यातील पैंगिण
दीक्षागुरु : श्री भूविजयरामचंद्र तीर्थ (१५)
शिष्यस्वीकार : श्री लक्ष्मीनाथ तीर्थ (१६)
महानिर्वाण : श्रीशके १७२६ रक्ताक्षी संवत्सर अधिक चैत्र शुक्ल ९मी सोमवार (१९-०३-१८०४)
वृंदावन स्थळ : श्री लक्ष्मीवेंकटेश देवस्थान व्यंकटापुर भटकळ
गुरुपीठकालावधी : ३ महिने २५ दिवस

श्री भूविजय रामचंद्रतीर्थ स्वामी यांचे श्रीरमानाथतीर्थ हे शिष्य. पैंगीण येथील महालवाड्यावरील ज्या भटभुते कुळांत परंपरेचे तेरावे स्वामी श्रीकांततीर्थ यांचा जन्म झाला, त्याच कुळांत पंधराव्या परंपरेचे श्रीरमानाथतीर्थ हेही जन्मले. काणकोण तालुक्यातले हे तिसरे आचार्य होत. हे मोठे शापानुग्रह समर्थ होते असे त्यांचे वर्णन करण्यात येते. ते एक वर्ष शिवरात्रीच्या पर्वणीकरिता गोकर्णास गेले होते. त्यावेळी घडलेल्या एका चमत्काराची हकीकत सांगण्यात येते ती अशी - “ते पर्वणीच्या दिवशी समुद्रस्नान करून छत्र, चामरे, वाद्य, पालखी सरंजामासह मठात जात असताना तेथील अव्दैती ब्राह्मणांनी वाटेत त्यांस प्रतिबंध केला. ती भर दुपारची वेळ असल्याने डोक्यास सूर्याचे प्रखर ऊन व पायाखाली जमीन तापलेली यामुळे श्रीस्वामींसह त्यांच्या परिवारास अतोनात त्रास होऊ लागले. पण ते ब्राह्मण त्यांस जाऊ देईनात. अनेक त-हेने शिष्टाई केली, तरी पण शिष्टाईचा उपयोग होत नसल्याने श्रीस्वामींना क्रोध आला त्या क्रोधाने ब्राह्मणांच्या गल्लीत आग भडकली व ती आग विझविण्यासाठी ब्राह्मण पळत सुटले. रस्ता मोकळा झाला आणि श्रीस्वामी आपल्या परिवारासह मठात आले." पुढे ते व्यंकटापूर मठात गेले. तिथे आकस्मिकपणे ते आजारी पडले. देवपूजेसाठी दररोज स्नान करणे भाग होते. त्यामुळे आजार वाढला. निर्वाणकाळ जवळ आला. अशावेळी एका ११ वर्षाच्या बटूस संन्यासदीक्षा देऊन त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. या बटूचा शोध देखील एक विधिघटना असल्याचे सांगतात. श्रीरमानाथ तीर्थाचे गुरु भूविजयरामचंद्रतीर्थाच्या कारकीर्दीची माहिती देताना ते बराच वेळ तीर्थयात्रेत घालवीत व त्यामुळे शिष्यस्वामी श्री रमानाथतीर्थ संस्थानचा कारभार पाहात. श्री भूविजयरामचंद्रतीर्थ तीर्थयात्रेत असतांनाही गुरुशिष्यांचा पत्रव्यवहार होत असे. अधिक जेष्ठ शु. ६ शके १७२३ च्या एका पत्रांत गुरुस्वामी लिहितात “वैशाख शु. ६ ष्ठी तारीखचा रायस लिहून पाठविला त्याचे प्रत्युत्तर कळले नाही. तरी केळोशी कुशस्थळीकार व सुंकेरी पेठकार यांचा जातीबाबत कोणी प्रकारे निवडला तो मजकूर लिहून पाठवणे. आणखी गतवर्षी वेंकटेश कामति म्हामाई याने तांब्याची नवी थाळी करून पर्तगाळीत पाठवावी म्हणून होडीमध्ये पाठवून दिली होती. ती काही पर्तगाळी पोहोचली तर उत्तम. नाहीतर कोठे आहे याचा शोध करून वेंकटेश कामती म्हामाई यांस लिहून पाठवून आणावी...." आपल्या आजारातच व्यंकटापूर मठात १७२६ रक्ताक्ष संवत्सर अधिक चैत्र शुद्ध नवमीला श्रीरमानाथ तीर्थस्वामी यांचे निर्वाण झाले. वेंकटापुर मठांत त्यांचि समाधी आहे.

यस्य रोषाड्कुराज्जातो भस्मसादकरोच्छिखी ।
गृहान्दुहैविकाणां तं रमानाथगुरुं भजे ॥