श्री आनंद तीर्थ
जन्मस्थळ : अवर्सा (अंकोला)
संन्यासदीक्षा : शीशके १७२७ क्रोधन संवत्सर चैत्र शुक्ल १३ गुरुवार (११/०४/१८०५)
दीक्षास्थळ : पर्तगाळी मठ
दीक्षागुरु : श्री लक्ष्मीनाथ तीर्थ (१६)
गुरुपीठारोहण : श्री शके १७४३ वृष संवत्सर माघ कृष्ण १४ बुधवार (२०/०२/१८२२)
शिष्यस्वीकार : श्री पूर्णप्रज्ञ तीर्थ (१८)
महानिर्वाण : श्री शके १७५० सर्वधारी संवत्सर श्रावण शुक्ल ९ रविवार (१९/०८/१८२८)
वृंदावन स्थळ : पर्तगाळि मठ
शिष्यकालावधी : १६ वर्ष १० महिने ०९ दिवस
गुरुपीठकालावधी : ०६ वर्ष ०६ महिने ०० दिवस
मठसेवाकालावधी : २३ वर्ष १० महिने ०९ दिवस
मठस्थापना : श्री वीर विट्ठल मठ बाळ्ळी
विशेषकार्य : पर्तगाळी मठाच्या विस्थारासह जीर्णोद्धार, पर्तगाळित नूतन मारूति घूड स्थापना, रीवण मठ जीर्णोद्धार, बाळ्ळीमठ, बदरिनाथ यात्रा.
श्री आनंदतीर्थ हे मठाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणारे म्हणजे व्यवहारदृष्टी असलेले होते. परंतु व्यावहारिक पाशात स्वतः ते गुरफुटून गेले नाहीत. अत्यंत विरक्त अशी त्यांची ख्याती होती. संस्थानचा कारभार त्यांनी चालविला. व्यवहार सांभाळला, पण स्वतःची पारमार्थिक उन्नती करून घेण्यात ते उणे पडले नाहीत. श्रावण शुक्ल नवमी (क्रि.श. १८२८) श्रीआनंदतीर्थ स्वामींनी जी लौकिक कार्ये केली, त्यांतले सर्वात मोठे कार्य म्हणजे पर्तगाळ मठाचा जीर्णोद्धार. १७३१ शुक्ल संवत्सर वैशाख वद्य-७ला जीर्णोद्धार शुरु झाल आणी १७३२ प्रमोद संवत्सर ज्येष्ठ शुक्ल-८ मिला श्री राम, सीता लक्ष्मण मुर्तिच्या पुनःप्रातिष्ठा संपन्न झाली. (क्रि.श. १८१०). मठाच्या पटांगणात त्यांनी मारुतीसाठी एक उंच धूड बांधला (क्रि.श. १८२१) त्याचप्रमाणे पैंगीण गावातील परशुराम देवालयाच्या उभारणीस देवालयाच्या महाजन मंडळीस मदत केली. वेताळ देवालयात उत्सवाच्या वेळी एक कापडाचा 'टका' वाचण्यात येतो. तो टका शके १७४५ (क्रि.श. १८२३) वर्षी स्वामीजींनी तयार करून दिला. श्री आनंदतीर्थ शिष्यस्वामी असताना शके १७३१ मध्ये उत्तरेतून बडोद्यावरून गोकर्णला परत येत होते. त्यावेळी ६० ब्राह्मण, ३० शिपाई, २ उंटस्वार, सोळा घोडेस्वार, दोन बैलस्वार व एक पालखी यांसह जाण्यास गायकवाड सरकारने परवाना दिला होता. गोकर्णचे आनंदतीर्थ स्वामी हे १०० माणसे, एक पालखी, १० घोडे, १ हत्ती यांसहीत यात्रेला जात आहेत त्याना कोणी अवरोध करूं नये असा रहदारी हुकूम जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेटने दिला होता. असेच दोन हुकूम शके १७३९ साली व १७४१ वर्षी दिले होते अशी नोंद दप्तरी नमूद आहे. श्री आनंद तीर्थ यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक तीर्थयात्रा केल्या. शके १७३३ (१८११) प्रजापती संवत्सरांत त्यांनी रामेश्वर क्षेत्राची यात्रा केलेली असून त्या निमित्ताने अनंतशयन, तोताद्रि, कुंभकोण श्रीरंगम्, विष्णुकांची वगैरे क्षेत्रांत जाऊन देवदर्शन घेतले. ईश्वर संवत्सर शके १७३९ (क्रि.श.१८१७) हिमालयांतील बदरीनाथ क्षेत्राची यात्रा करण्याचा संकल्प करून उत्तर भारतांतील अधिकाधिक तीर्थक्षेत्रांची यात्रा घडावी असा दृष्टिकोन ठेवला. त्यावर्षी चातुर्मास व्रताचरण श्री आनंद तीर्थानी वारणासी येथील स्वकीय मठात केले. चातुर्मास व्रताची यथोचित सांगता झाल्यावर श्री स्वामीजींनी बदरीनाथकडे प्रस्थान केले. वाटेत उत्तरदेशीय तीर्थांचे संदर्शन केले. बदरीनाथहून परतण्याच्या वाटेवर शके १७४० मध्ये पुन्हा वारणासी येथील स्वकीय वारणासी मठी चातुर्मास व्रतचरण केले (क्रि.श.१८१८) तेथून परत गोव्याला येत असताना प्रमाथी नाम संवत्सर शके १७४१ मधील चातुर्मास व्रताचरण (क्रि.श.१८१९) गोव्यातील माशेल गावांत केले. तीर्थयात्रांच्या दरम्यान लागोपाठ तीन चातुर्मास आचरण्यात आले यावरून या तीर्थयात्रा किती खडतर होत्या याची आपण कल्पना करू शकतो. श्री आनंदतीर्थाच्या कारकीर्दीतल्या काही ठळक घटनाः शके १७४६ ज्येष्ठ शु. ७ मीला श्रीआनंदतीर्थ स्वामींनी माशेल येथून काशीच्या पंचगंगा घाटवरील अनंत भट उजे यांना आज्ञापत्र लिहून कळविले की दरवर्षी तुम्हास ५० रूपये पाठवीत जाऊ. या रकमेतून "तेथील मठ भाडेस सालाबाद मठ खर्च वजा करून बाकी रुपये राहातील ते सुध्दा तुम्ही खर्च करून श्रीची पूजा अविच्छिन्न चालवून तेथ मठाचा परामर्श वरचेवर करीत असावे'. ५० रूपयांहून अधिक रकम पाठवायला हवी असे स्वामीजींना वाटते, परंतु येथे दिवसेंदिवस ग्रहस्त काळ कठिण आहे' या शेवटच्या वाक्यावरून ते शक्य दिसत नाही असे स्वामींना सुचवायचे असावे. शके १७४७ फाल्गुन कृष्ण ३ येला सौंदेकर राजे बसवलिंग महाराज व त्यांचा कुमार सदाशिव महाराज यांनी पर्तगाळ मठाला भेट दिल्याची कीर्दीत तपशीलवार नोंद आहे. सौंदेकर राजे त्यावेळी कायम वसतीला बांदोडे येथे असत. हैदरअलीच्या स्वारीमुळे हे राजघराणे शके १७१३ च्या सुमारास तिथे येऊन राहिले होते. तृतीयेपासून अष्टमीपर्यंत पांच दिवस सौंदेकर राजे व युवराज यांचा मुक्काम पर्तगाळी मठात होता. शके १७४७ फाल्गुन शुक्ल ६ श्री आनंद तीर्थ संचारार्थ बाहेर आसतांना कुमठाहून एक लहानसे पत्र आपले शिष्य पूर्णप्रज्ञतीर्थ यांस त्यानी पाठविले. यावरून शिश्याच्या अध्ययनाबाबत श्री स्वामी किती जागरूक असत याची कल्पना येते. त्यांस ते म्हणतात …. “तर तुम्ही दुसरे ठायी चित्त न ठेवितां व्यासंगावर लक्ष ठेवून देवपूजाही संकोचित करून रात्रंदिवस पाठ म्हणत आसावे.” गोमांतकातील सारस्वत ब्राम्हणांची भिक्षुकी कृत्ये तसेच देवस्थानांतील वृत्ति द्रविड ब्राम्हणाकडे होती. कारण सारस्वतांमध्ये वैदिकी असली तरी भिक्षुकी पेषा नव्हता. हा पेषा करणारी पुरोहित घराणी सारस्वत ब्राम्हणात निर्माण व्हावी असा प्रयत्न कांही आचार्यानी केलेला दिसतो. यापैकी श्री आनंदतीर्थ हे एक. त्यांनी शके १७४९ आषाढ व.२ला मालवणचे कृष्णा लाडे प्रभु व विठो प्रभु झांटये यांना एक आज्ञापत्र लिहून स्वज्ञातीय पुरोहितास तुमचाकडे पाठवित आहोत. त्यांच्याकडून हव्यकव्यादि सर्व वैदिकधर्म यथासांग चालवून घ्यावे. कारण “ ते प्रांति आमचे गृहस्थ वास्तव्य करून आहेत. त्यांचे तेथे हव्यकव्यादिक पुरोहित परज्ञातीचे ब्राम्हण भेद करितात, वैदिक कर्म यथोचित चालवित नाहीत.” असे आपणास समजले आहे. असे हे विरक्त पण व्यवहार निपूण कर्तबगार यतिवर्य पर्तगाळ मठांत शके १७५० सर्वधारी संवत्सरात श्रावण शुद्ध ९ ला मोक्षारूढ झाले.
आनन्दतीर्थमौनीन्द्रं सदानन्दपयोनिधिम् ।
प्रवन्दे दीनमन्दारं सनन्दाप्तये सदा ॥