Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

श्री पूर्णप्रज्ञ तीर्थ

जन्मस्थळ : मुडगेरि/शिवेश्वर (कारवार)
जन्मनाम : गणेश विट्ठल भट्ट मठकर
जन्मतिथी : श्री शके १७३१ शुक्ल संवत्सर भाद्रपद शुक्ल ४थी बुधवार (१३/०९/१८०९)
संन्यासदीक्षा : श्रीशके १७४६ तारण संवत्सर चैत्र शुक्ल १५ मंगळवार (१३/०४/१८२४)
दीक्षास्थळ : श्री जीवोत्तम मठ - गोकर्ण
दीक्षागुरु : श्री आनंद तीर्थ
गुरुपीठारोहण : श्रीशके १७५० सर्वधारी संवत्सर श्रावण कृष्ण ५मी शुक्रवार (२९/०८/१८२८)
शिष्यस्वीकार : श्री पद्मनाभ तीर्थ (१९)
महानिर्वाण : श्रीशके १८०१ प्रमाथी संवत्सर ज्येष्ठ शुक्ल २या शुक्रवार पर्तगाळी मठ (२३/०५/१८७९)
वृंदावन स्थळ : पर्तगाळी मठ
शिष्यकालावधी : ०४ वर्ष ०४ महिने १७ दिवस
गुरुपीठकालावधी : ५० वर्ष ०८ महिने २९ दिवस
मठसेवाकालावधी : ५५ वर्ष ०२ महिने ११ दिवस
आयुर्मान : ६९ वर्ष ०९ महिने ११ दिवस
मठस्थापना : कुंकळ्ये सन् १८८० श्री वीर विट्ठल शिला विग्रह.

श्री पूर्णप्रज्ञतीर्थस्वामी हे पूर्वाश्रमीचे गणपती भट मठकर, कारवार तालुक्यातील मुडगेरी मठाचे मठकर विट्ठल भटजी यांचे व्दितीय पुत्र. त्यांना गोकर्ण मठांत गरु श्री आनंदतीर्थ यांनी संन्यास दीक्षा दिली. शके १७५० मध्ये आनंदतीर्थ यांनी समाधी घेतल्यावर त्याना पट्टाभिषेक करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीस प्रारंभ झाला. यांची कारकीर्द दीर्घ मुदतीची म्हणजे जवळ जवळ ५० वर्षांची झाली.
श्रीपूर्णप्रज्ञतीर्थांनी स्वतः अध्ययनात खूप काळ घालविला. श्री मध्वाचार्यांच्या ब्रह्मसूत्रांचा त्यांचा जबरदस्त व्यासंग होता. महाचार्यांचे इतर ग्रंथही त्यांनी अभ्यासिले होते व इतर अभ्यासकांसही ते स्वतः पाठ देत होते.
श्रीपूर्णप्रज्ञतीर्थ आचार्य हे अत्यंत विद्वान व विरक्त म्हणून त्या काळी मान्यता पावले होते. त्यांचे अध्ययन प्रथम श्री आनंदतीर्थ व नंतर काशीचे विव्दान पंडीत यांच्याकडे आले आणि नंतर स्वतः व्यासंगाने त्यांनी आपले ज्ञान वाढविले. या अध्यात्मज्ञानाने ते स्वयंकेंद्रीत बनले नाहीत. आपण एका संप्रदायाचे प्रतिनिधी आहोत आणि समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, आपल्या हाती असलेल्या साधनांचा व अधिकारांचा उपयोग केला पाहिजे याचे त्यांना भान होते. म्हणूनच अनेकांना विद्यादान करण्यातच आपल्या कालाचा सदुपयोग केला. पैंगीण येथील परशुराम देवालयात शके १७९९ मध्ये त्यांनी सहस्रब्राह्मणसंतर्पण केले. माशे येथील निराकार देवालयाच्या मागच्या बाजूस खाडीवर पूल बांधला. तसेच पैंगीण येथील नारायण देवस्थानाजवळच्या नदीवरही पूल बांधला.
श्रीस्वामीनी काही काळ तीर्थयात्रेत घालविला. एका तीर्थयात्रेत त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारतभ्रमण केले. या भ्रमणास त्यांना तीन वर्षे लागली. शके १७८१-८२ च्या सुमारास त्यांनी या तीर्थयात्रेस प्रारंभ केला असावा. कारण परत येताना शके १७८४ च्या मार्गशीर्ष मासात ते पुण्याला होते असे दप्तरातील कागदपत्रात नमुद आहे. प्रथम त्यांनी दक्षिण भारताची यात्रा केली. श्री शैल, तिरुपती, कांची, रामेश्वर, कन्याकुमारीवरून ते त्रिवेंद्रमला आले व पश्चिम किनाऱ्यावरील मार्गाने मधली तीर्थक्षेत्रे पाहून पर्तगाळीस आले.
पुढे ते उत्तरयात्रेला गेले. प्रथम कोल्हापूरला जाऊन त्यांनी माता अंबाबाईचे दर्शन घेतले. नंतर नासिकवरून ते प्रयाग क्षेत्री गेले. तिथे संगमावर स्नान करून तसेच काशीक्षेत्री जाऊन गोकर्ण-पर्तगाळ संस्थानच्या शाखामठात निवास केला. या मुक्कामात त्रिवेणीस्नान म्हणजे गंगेत त्रिकाल स्नान करण्याची त्यांची पध्दत होती. आपल्या मठात त्यांनी सहस्रब्राह्मणसंतर्पण केले व दररोज बारा ब्राह्मणांना भोजन देण्याला जरूरी तितके व्याज येईल एवढा कायमचा निधी काशीच्या राजाकडे ठेव म्हणून ठेवला.
काशीतील सर्व विव्दान ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांचा परामर्श घेतला व त्यांस दक्षिणा दिली. श्रीपूर्णप्रज्ञतीर्थांच्या पन्नास वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांचे शिष्य श्रीपद्मनाभतीर्थ यांनी मठाच्या कारभाराच्या बाबतीत त्यांना खूप मदत केली. गुरुस्वामीचे लक्ष मठाच्या दैनंदिन कारभाराकडे फारसे नसावे. त्यांच्या कारकीर्दीत संस्थानची आर्थिक स्थिती सुधारत चालली होती व काही जमिनींची दानपत्रे मिळत होती, काही जमिनी विकतही घेतल्या गेल्या होत्या. परंतु खुद्द गुरुस्वामीनी तीन जमिनी विकत घेतल्याची नोंद असून शिष्यस्वामीनींच अधिक जमिनी खरेदी केल्याचे बारनिशीवरून दिसते.
आतापर्यंत गोकर्ण पर्तगाळ मठाचा जो इतिहास सांगितला, त्यावरून हा मठ म्हणजे एक गुरुपीठ असून या पीठाचा अंतर्गत तसाच बहिर्गत कारभार पीठाधिष्ठीत आचार्य पहात असत असे दिसून येईल. धार्मिक अधिकार तर त्याना जणू स्वयंभूच होते. आदिलशाहीपासून इंग्रजापर्यंत ज्या राजवटी झाल्या त्यात जमिनी वा मानमरावत वा इतर काही आर्थिक प्रश्नाबाबत सरकारदरबारी पत्रव्यवहार होई. किंवा तक्रारी, अर्ज करायचे असत. ते एकतर स्वतः स्वामी करीत किंवा त्यांनी मुखत्यारी दिलेले लोक करीत. परंतु पोर्तुगीज राजवट काणकोणमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर सुमारे पन्नास वर्षांनी सरकारने पर्तगाळ मठाच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न निर्माण झाला तो पर्तगाळचा मठ हा स्वामींच्या मालकीचा आहे की महाजनांचा? कुणीतरी चुगली केली आणि मठावर महाजनांचा अधिकार असल्याचे गोवा सरकारला सुचविले. याबाबत मग शके १७६८ (इ.स. १८४६) मध्ये चौकशीस प्रारंभ झाला आणि शके १७७४ मध्ये मठाचा कारभार चालविण्यासाठी सरकारने दोन समित्या नेमल्याचे जाहीर केले. सरकारचा या बाबतचा निर्णय सरकारी गॅझेटमध्ये १७ मे १८५२ या दिवशी प्रसिध्द झाला. नंतर सन १८६६ सालांत गोव्यातील देवालयांसंबंधीचा कायदा तयार केला. हा कायदा पर्तगाळी मठाला व देवालयाला लागू करू नये असे प्रयत्न स्वामीजीतर्फे करण्यात आले. हे देवालय व मठ कुणा विशिष्ट महाजन मंडळीचे नसून सारस्वत ब्राह्मणांतर्गत समस्त वैष्णव सांप्रदायिकांच्यातर्फे आपण विश्वस्त म्हणून कारभार पहात असून ते एक स्वतंत्र संस्थान आहे असे स्वामींनी निवेदन केले. पुढे हे सर्व प्रकरण पोर्तुगालपर्यंत जाऊन देवालयाचा कायदा पर्तगाळ मठाला लागू करू नये असा शेवटी निवाडा झाला. पण हे होईपर्यंत श्रीपूर्णप्रज्ञतीर्थ समाधिस्त झाले होते व त्यांच्या जागी पीठाधीश म्हणून श्री पद्मनाभतीर्थ आले होते.
शके १८०१, प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुध्द व्दितीया या दिवशी पर्तगाळी मठात त्यांनी समाधी घेतली.

पीत्वा सम्यक्सुधासारं चरित्वा वसुधातलम् ।
वादिवारा जिता येन पूर्णप्रज्ञगुरुं भजे ।।