Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

1 Narayan M

१ श्रीमद् श्री नारायण तीर्थ

दीक्षागुरु : श्री रामचंद्र तीर्थ (१०) पलिमारुमठ – उडुपि.
संन्यास दीक्षा : श्री शके १३९७ मन्मथ संवत्सर चैत्र शुक्ल २या, मत्सजयंती (१८/०३/१४७५ गुरुवार)
दीक्षा स्थळ : देवभूमि हिमालय बदरिकाश्रम (चमोली जिल्हा, उत्तराखंड)
शीष्य स्वीकार : श्री वासुदेव तीर्थ (२)
महानिर्वाण : श्रीशके १४३९ ईश्वर संवत्सर चैत्र अमावास्या (३०/०४/१५१७ सोमवार)
वृंदावन : गोपिनदी तीरे भटकळ (उत्तर कन्नड)
गुरुपीठावर काळ : ४२ वर्षे ०१मास १२ दिवस
मठ स्थापना : १. श्री लक्ष्मीनारायण मंदिर (पंचगंगा घाट वारणासी) (पंचधातु लक्ष्मीनारायण प्रतिमा)
२. वडेरमठ भटकळ श्री विट्ठल शिला विग्रह (मूळ मठ)

स्वामीजींचा इतिहास

वडेरपदवीधारं नारायणपरायणम् । नारायणयतिं गौडसारस्वतगुरुं भजे
पलिमारु मठाचे दहावे मठाधिपती श्रीरामचंद्रतीर्थ हे बदरिनारायण यात्रेस गेले असता तेथे आजारी पडले. या प्रसंगी परिवार मंडळीत चतुर्थाश्रमास योग्य असा ब्रह्मचारी, गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातिंतील माधव नांवाच्या शिष्याशिवाय जवळ कोणीही नव्हता. मंत्रमुद्राधारणादिकाने स्वाश्रमोपयुक्त वैष्णव संप्रदाय दीक्षा देऊन अधिकारी शिष्य केल्याशिवाय देहास पंचत्व प्राप्त झाले तर परलोक दुर्लभ! असा पेचप्रसंग पडल्यामुळे त्यांना स्वप्नामध्ये साक्षात् श्रीरामदेवाची प्रेरणा होऊन सान्निध्यात हजर असलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण कुलोत्पन्न माधव नामक ब्रह्मचाऱ्याला शके १३९७ मन्यथ संवत्सर, चैत्र शुध्द द्वितीयेस विधिपुरस्सर आश्रमदीक्षा, दंडधारणादि देऊन अधिकारी शिष्य केले व श्रीनारायणतीर्थ या नांवाने योगपट्ट दिला. श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ या नांवाने ख्याति पावलेल्या श्रीगुरुमठाची संस्थापना खऱ्या अर्थाने हिमालयांत बद्रिकाश्रम येथे चैत्र शुक्ल २या शके १३९७ (1475 A.D.) या दिवशी योगायोगाने झाली. मध्व संप्रदायाच्या द्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी श्रीमध्वाचार्य यांनी उडुपी येथे अष्टमठ स्थापन केले होते. या अष्टमठांपैकी पलमारु मठ हा एक होय. पश्चिम भारतांत विखुरलेल्या वैष्णव संप्रदायाचा सारस्वत समाज या मठाचे अनुयायित्व पत्करून बसला होता. संन्यास व्रताची दीक्षा घेतल्यानंतर उत्तर भारतांतील तीर्थाटनाचा संकल्प पुरा करूनच उडुपीला परतण्याचा विचार श्रीनारायणतीर्थांनी केला आणि कुरुक्षेत्र, ब्रह्मावर्त, ब्रह्महद अशी तीर्थक्षेत्रे करीत करीत ते त्रिभुवनात सुप्रसिध्द असलेल्या वारणासी क्षेत्रात दाखल झाले. वारणासी हे एक आद्य वैष्णव स्थान असून श्रीमन्नारायणाचे ते निवासस्थान असल्याची आख्यायिक श्री नारायण तीर्थांनी पुराणांत वाचली होती. कार्तीकमास जवळ येवून ठेपला आहे आणी कार्तीक मासांत पंचगंगा घाटावरील स्थानाला अनन्य महत्व आहे याचीही त्याना कप्लना होती. प्रभु श्रीरामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळी वर्षभर वारणासी क्षेत्रांत त्यानी वस्तव्य केले याचा रामायणांतील उल्लेखही स्मरणांत होता. श्री नारायण तीर्थ पंचगंगा घाटाच्या त्या काळांतील प्रशांत वातावरणाने मुग्ध झाले. आनंद रामायणांतील एक श्लोक त्यांना मुखोद्गत होता. त्यानी मनंतल्या मनंत तो श्लोक उच्छारला : तथा चकार रामोऽपि घट्टबंधनमुत्तमम् । दृश्यते प्रत्यहं यत्र काश्यां रामः ससीतया ॥ चकार पंचगंगायां कर्तीकस्नानमुत्तमम् । काशीवासं वर्षमेकं चकार धर्मतत्परः ॥ (आनंद रामायण ३/६/३७/३८) कार्तिक महिन्यांतीलच गोष्ट. राजकन्या आपल्या सख्या व दासीसमवेत गंगास्नानाला आली. अंगावरचे मौल्यवान अलंकार उतरवून नदी किनारी वस्त्रांवर ठेवले. नेहमीचाच तो रिवाज. राजकन्येने गंगापात्रात डुबकी घेतली आणि तिच्या अंगांत हुडहुडी भरली. लगबगीने किनाऱ्यावरील कोरडे वस्त्र ओढून तिने अंगावरची ओली वस्त्रे सोडली. हळूहळू सारी मंडळी स्नान आटोपून राजवाड्यात परतायची तयारी करताना लक्षात आले की राजकन्येची वज्रजडित बांगडी हरवली आहे. नुकतीच काढून ठेवलेली बांगडी जाणार कुठे? शोधाशोध सुरू झाली. भर दिवसा राजकन्येची बज्रजडित बांगडी चोरण्याचे साहस करवले तरी कोणा ? घाटाच्या एका कोपऱ्यात एक संन्यासी जपानुष्ठानाला बसलेला दिसला. अनेकांनी या परदेशस्थ संन्याशाला तेथे पाहिले होते. राजकन्येचा अलंकार हरवल्यामुळे मोठा कोलाहल झाला तरी श्रीनारायणतीर्थांच्या ध्यानांत व्यत्यय आला नाही. शिपायांनी येऊन त्यांच्या ध्यानाचा भंग केला आणि राजकन्येच्या हरवलेल्या बांगडीची माहिती देऊन त्या परदेशी संन्याशावर वहीम असल्याचे बोलून दाखविले. “सर्वसंग परित्याग करून संन्यास व्रताचा स्वीकार केलेल्या आम्हा संन्याशांना धन-अलंकाराचे प्रलोभन असण्याचे कारणच नाही. जेथे आम्ही दोन प्रहरच्या घासाची पर्वा करीत नसतो, तेथे स्वीकृत असंग्रह व अस्तेय व्रताशी द्रोह करून संन्यास धर्माशी प्रतारणा कां बरे करणार?” श्रीनारायणतीर्थ यत्किंचितही विचलित झाले नाहीत. पण त्यांची प्रांजळ भाषा शिपायांना समजली नाही व त्यांनी संन्याशाची झडती घेतली. झडतीत काही सांपडले नाही तेव्हा शिपाई हिरमुसले. श्रीनारायणतीर्थांच्या निरपराधित्वाबद्दल संदेह राहिला नाही. प्रवाहाचे पाणी निवळल्यावर गंगापात्रांत शोध घेतला व बांगडी सांपडली. राजघराण्यातील मंडळीने श्रीनारायणतीर्थांची माफी मागितली. एका निरपराध संन्याशाशी राजसत्तेने आगळीक केली ही गोष्ट काशी नरेशांच्या कानावर गेली. या प्रमादाचे प्रायश्चित घेतले पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले व ते पंचगंगा घाटावर येऊन श्रीनारायणतीर्थां समोर नतमस्तक झाले. “जे घडले त्या प्रकारामुळे आम्ही लज्जित झालो आहोत. स्वामीजींनी आम्हाला क्षमा करावी.” काशी नरेशाने प्रार्थना केली. श्रीनारायणतीर्थ म्हणाले, "तुमच्या राज्यात धर्म व धार्मिकतेला नेहमी उदार - आश्रय मिळत आलेला आहे. या पंचगंगा घाटाजवळ गंगामातेने प्रवाहाची दिशा बदलून ती ईशान्यप्लवा झाली आहे. आम्ही सदूर अपरांत प्रांतातील गौड सारस्वत ब्राह्मण, पण आमच्या मनात काशी क्षेत्रातील गंगामैंयाबद्दल आकंठ भक्ति भरलेली आहे. आमच्या समाजाचे लोक अधिकाधिक संख्येने या ठिकाणी पोचावे, जगन्मातेचे त्यांना दर्शन घडावे, ईशान्यप्लवा प्रवाहामध्ये पुण्यस्नान करण्याचे भाग्य त्यांना मिळावे यासाठी एक मठवास्तु उभी करावी अशी आमची मनोकामना आहे. याकामी नरेशांनी आस्था दाखविली तर ते एक पुण्यकार्य ठरू शकेल." पश्चात्तापदग्ध झालेल्या काशी नरेशांना श्रीनारायणतीर्थांच्या उद्गारांनी दिलासा मिळाला. त्याच घाटावर बिंदुमाधव मंदिराच्या सन्मुख ईशान्यप्लवा गंगेच्या तीरावर एक मठ उभा झाला आणि त्या ठिकाणी पंचधातुमय श्रीलक्ष्मीनारायणाच्या प्रतिमेची विधिवत् - प्रतिष्ठापना करून श्रीनारायणतीर्थांनी नित्य पूजाअर्चेची व्यवस्था केली आणि काशीहून ते परतले. सारस्वत ब्राह्मण वैष्णव परंपरेतील हा पहिला मठ होय. ही घटना शके १३९७ मन्मथ संवत्सरात (१४७५ एडि )घडलि आहे. काशी येथे श्रीमठाची स्थापना केल्यानंतर श्रीनारायणतीर्थ उडुपीला परत आले. काही दिवसांनी असाध्य मानल्या जाणाऱ्या आजारांतून पलिमारुमठ गुरुवर्य श्रीमद् रामचंद्रतीर्थ बरे होऊन स्वीय मठात परतले. श्रीनारायणतीर्थांना पाहून गुरुस्वामींची मनःस्थिती द्विधा झाली. तीर्थयात्रेत ज्यांनी आपली उत्तम सेवा केली व संन्यासदीक्षा घेतल्यानंतर श्रीवारणासी क्षेत्रात आपली पताका रोवून जे परतले, त्या नारायणतीर्थांचे पीठाधिकार हिरावून घेतलेले द्रविड ब्राह्मणांना हवे होते. पलिमारुमठ गुरुवर्यांनी आपल्या श्री विद्यानिधीतीर्थांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि श्री नारायणतीर्थांना गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे संघटन करून स्वतंत्र मठ परंपरा निर्माण करण्याचा सल्ला दिला. उडुपीहून श्रीनारायणतीर्थ भटकळ येथे आले आणि त्यांनी तेथे एक मठवास्तु उभी करून परशुराम क्षेत्रांत सारस्वत समाजामध्ये धर्मकार्यास आरंभ केला. तोच श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ आज सारस्वत अस्मितेचा व एकात्मतेचा प्राणरक्षक मानदंड मानला जातो. इतिहासाने विघटीत केलेल्या व नियतीने अनेक दिव्ये पार करण्याची सजा फर्मावलेल्या ह्या समाजाच्या संधारणाचे व संघटनेचे कार्य तब्बल ५४७ वर्षे पार पाडून समाजाला अधिक ऊर्जस्वल बनविण्यासाठी अविरत कार्यरत राहिलेल्या ह्या मठाच्या यशोगाथेत सारस्वत समाजाचा इतिहास सामावलेला आहे. या दीर्घ कालावधीत श्री मठाला अखंडित २४ स्वामीजींची परंपरा लाभली. ईशान्यप्लवा गंगेच्या तीरावर श्रीनारायण तीर्थांनी ह्या मठाचे जे लहानसे रोपटे रोवले त्याची या परंपरेने निगा राखून अभिवृध्दीची काळजी घेतली म्हणूनच आज एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे त्याची पाळेमुळे, फांद्या विस्तारून तो सुदृढ होऊ शकला. गुर्वाज्ञेप्रमाणे श्रीनारायणतीर्थ भटकळला आले व नूतन मठ स्थापनेच्या पूर्वतयारीस लागले. भटकळ व त्या गांवच्या पंचक्रोशीतील सारस्वत ब्राह्मणांनी त्यांचे स्वागत करून त्यांस खूपच मदत केली. त्या काळात उत्तर व दक्षिण कानडा प्रदेशात सारस्वत ब्राह्मणांची वस्ती होती की काय अशी एक शंका उपस्थित करता येईल. कारण सर्व साधारण समज असा आहे की गोवा ही सारस्वत ब्राह्मणाची मूळभूमी आहे आणि इ.स. १५४० नंतर पोर्तुगीजांनी गोव्यात बाटाबाटिचे व मंदिरनाशाचे जे सत्र सुरू केले, त्यावेळीच गोव्यातून बहुतेक सारस्वत ब्राह्मणांनी स्थलांतर केले. त्यांतले अनेक लोक मलबार व कोचीनपर्यंत गेले. पण ही घटना घडली त्यापूर्वी पाऊणशे शंभर वर्षे भटकळ मठाची स्थापना झाली होती. कह्राडे, देशस्थ, कोकणस्थ, वगैरे द्रविड ब्राह्मणांची वा गुर्जर, कनोजी, मैथिली वगैरे गौड़ ब्राह्मणाची अशी स्वतंत्र गुरुपीठे नाहीत. या दृष्टीने गोकर्ण पर्तगाळच्या सारस्वत यतिवर्यांनी सारस्वत ब्राह्मणांसाठी स्थापन केलेले गुरुपीठ हे पहिले वैशिष्ट्यपूर्ण गुरुपीठ होय. २०२२ ह्या शकवर्षी सदर मठ स्थापन होऊन ५४८ वर्षे पूर्ण झाली. या पीठाचे संस्थापक श्री नारायणतीर्थ यांच्या अवतार समाप्तीची तिथी चैत्र अमावास्या