Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

श्री इंदिराकांत तीर्थ

जन्मस्थळ : भटकळ
जन्मनाम : रामकृष्ण नरसिंह पुराणिक
जन्मतिथी : श्रीशके १७९३ प्रजापति संवत्सर माघ शुक्ल ७मि गुरुवार (१५/०२/१८७२)
संन्यासदीक्षा : श्रीशके १८०८ व्याय संवत्सर वैशाख शुक्ल दशमी गुरुवार (१३/०५/१८८६)
दीक्षास्थळ : पर्तगाळी मठ
दीक्षागुरु : श्री पद्मनाभ तीर्थ (१९)
गुरुपीठारोहण : श्रीशके १८१४ नंदन संवत्सर आषाढ कृष्ण ३या मंगळवार (१२/०७/१८९२)
शिष्यस्वीकार : श्री कमलानाथ तीर्थ
महानिर्वाण : श्रीशके १८६४ चित्राभानु संवत्सर चैत्र कृष्ण ७मी मंगळवार (०७/०४/१९४२)
वृंदावन स्थळ : पर्तगाळी मठ
शिष्यकालावधी : ०६ वर्ष ०२ महिने ०० दिवस
गुरुपीठकालावधी : ४९ वर्ष ०९ महिने ०६ दिवस
मठसेवाकालावधी : ५५ वर्ष १० महिने २६ दिवस
आयुर्मान : ७० वर्ष ०२ महिने २४ दिवस
मठस्थापना : १) श्री बेटे वेंकटरमण देवस्थान होन्नावर (हस्तांतर) (२८/०२/१९२२)
२) श्री मुरलिधर मठ कारवार (शिलाविग्रह) (३०/०४/१९२३)
३) श्री लक्ष्मीवेंकटेश मठ मंकी होन्नावर (हस्तांतर) ११/०२/१९४६

श्री पद्मनाभतीर्थ स्वामींचे निर्वाण झाल्यावर श्री इंदिराकांततीर्थ हे पीठाधिपती झाले. भटकळ गावात पुराणिक नावाचे एक पंडीत घराणे होते. या घराण्यात एकाहून एक विद्वान पंडीत निर्माण झाले होते.
या घराण्यातील नरसिंह पुराणिक व पत्नी लक्ष्मी या दंपत्याच्या पोटी जे पुत्ररत्न झाले तेच हे गोकर्ण मठाच्या परंपरेचे विसावे गुरुवर्य श्री इंदिराकांत तीर्थ होत. त्यांचा जन्म शके १७९३, प्रजापती संवत्सर, माघ शु. ७ मी गुरुवार या दिवशी झाला.
लहानपणीच मुलाची तीव्र बुध्दिमत्ता, करारी स्वभाव आणि चौकस वृत्ति दिसून येई. बुध्दीची कुवत इतकी विलक्षण होती की अक्षर ओळख होण्यापूर्वीच कित्येक स्तोत्रे व संस्कृत श्लोक त्यांनी मुखोद्गत केले होते. घरांतले वातावरणही विद्याग्रहणाला अत्यंत अनुकूल होते. मुलगा दिसायला तेजस्वी, कांतिमान, राजपिंडा होता. अखेरपर्यंत वृध्दावस्थेतही त्यांचा कांतिमान देह कायम होता.
वयाच्या १५ व्या वर्षी पर्तगाळ येथे इंदिराकांततीर्थ स्वामींस संन्यास आश्रम देण्यात आला. त्यापूर्वी आवश्यक सोपस्कार करण्यात आले. श्री पद्मनाभतीर्थ स्वामीनी शिष्यस्वीकार करायचे ठरविले आणि पीठाच्या अनुयायांची बैठक घेतली. बैठकीत शिष्यस्वामीच्या पदासाठी भटकळच्या नरसिंह पुराणिकांच्या या चिरंजीवांची निवड करण्यात आली. त्याप्रमाणे मठाचे शिष्टमंडळ भटकळला गेले व त्यानी नरसिंह पुराणिकांकडे मुलाची मागणी केली. त्यांनी ती मान्य करून मुलाला शिष्टमंडळाच्या स्वाधीन केले. बटूला घेऊन शिष्टमंडळ पर्तगाळला आले. बटूला विधियुक्त आश्रम देण्याची तयारी करण्यात आली आणि शके १८०८ व्यय संवत्सर, वैशाख शु. १० मी या दिवशी मठानुयायांच्या उपस्थितीत बटूला आश्रम देण्यात येऊन त्यांचे श्री इंदिराकांततीर्थ असे नामकरण करण्यात आले.
आश्रम दिल्यानंतर शिष्यस्वामींच्या अध्ययनाची गुरुंनी व्यवस्था केली. एका विद्वान पंडीताची या कामी नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वतः गुरूस्वामीही त्यांना पाठ देऊ लागले. वेद, वेदांगे, काव्य, व्याकरण, साहित्य, न्याय, मीमांसा वगैरे सर्व ज्ञानशाखांचे त्यांनी अध्ययन केले. गीता व ब्रह्मसूत्रे यांचा इंदिराकांतस्वामींनी विशेष अभ्यास केला आणि याहून विशेष म्हणजे अव्दैत, विशिष्टाव्दैत व व्दैत या दर्शनांचा तुलनात्मक व्यासंग केला. मुळांत तीव्र बुध्दि, अभ्यासाची आवड, तासनतास श्रम करण्याची तयारी व चिकाटी या गुणांच्या जोरावर श्री इंदिराकांतांनी लवकरच एक विव्दान पंडीत म्हणून नावलौकिक मिळविला.
हा नावलौकिक मिळविण्याचे एक हुकमी साधन श्री इंदिराकांततीर्थांच्या हाती होते, ते म्हणजे प्रवचन. ते एका थोर पुराणिक घराण्यात जन्मले होते आणि पुराण प्रवचने करणे हा त्या घराण्यातील पुरुषांचा पिढीजात व्यवसाय होता. स्वामीजींच्या आयुष्यात मठाधिपती होण्याचा योग आला नसता तर त्यांनीही ही घराण्याची परंपरा पुढे चालविली असती आणि एक विव्दान पुराणिक म्हणून कीर्तीही मिळविली असती. पुराणिकांच्या व्यवसायाला लागणाऱ्या विव्दतेपेक्षा कितीतरी अधिक ज्ञानसाधना त्यांनी केली होती. अध्यात्माची खोली धुंडाळली होती, विविध दर्शनांच्या सागरात खोल बुडी मारून सिद्धांताचे मोतीही गोळा केले होते. ज्ञान, योग आणि कर्म मार्गाने त्यांची वाटचाल चालू झाली होती. विशेष म्हणजे अवघ्या काही वर्षात ही किमया घडून आली होती. तरुण शिष्याचा अधिकार गुरुस्वामींच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. त्यांना शिष्यस्वामींचा अभिमान वाटू लागला. एका बाजूने ते श्री इंदिराकांतांचे पूर्वाश्रमीचे मामा होते तर दुसऱ्या बाजूने गुरु होते. त्यांनी शिष्याला पुराण प्रवचने करण्यास प्रवृत्त केले. ती इतकी उत्कृष्ट असत की सर्वसामान्य श्रोतेच नव्हे तर जाणकारही त्यांच्या त्या ज्ञानगंगेच्या पुरात वाहून जात. खुद्द गुरुस्वामींना ती आवडत. पुढे भटकळला श्री इंदिराकांतस्वामी गेले होते तेव्हा त्यांच्या पुराणश्रवणाला खुद्द त्यांचे वडिल उपस्थित होते. नव्या आश्रमात पदार्पण केलेल्या आपल्या चिरंजीवाचे वक्तृत्व ऐकून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि आपण मुलगा गमाविण्याऐवजी काहीतरी कमावले असे त्यांना वाटू लागले. श्री इंदिराकांत स्वामींची प्रवचन पुराणे ही पुढे पीठानुयायांचेच नव्हे तर एकूण सर्व जनतेचे मोठे आकर्षण ठरले. मठ सोडून दिग्विजयासाठी ते बाहेर पडले म्हणजे प्रत्येक मुक्कामात दररोज संध्याकाळी त्यांनी प्रवचन करण्याचा परिपाठ पाडला. या प्रवचनातून केवळ नीतीभ्रष्ट होत जाणाऱ्या नव्या युगातल्या नव्या पीढीला आणि एकूणच समाजाला धार्मिक मूल्यांचा व आपल्या प्राचीन उर्जस्वल परंपरेचा पाठ देणे हा त्यांचा उद्देश होता. नव्या युगाचा नवा युगधर्म कोणता याची त्यांना जाणीव होती. या नव्या प्रवाहात सापडून सांप्रदायिकांनी धर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी पंक्तितता, बहिष्कार घालणे वगैरे आपल्या हातातील शस्त्रांचा उपयोग करून समाजस्थैर्य टिकविण्याचा प्रयत्न केला.
पण पुढे त्यांच्या लक्षात आले की सुधारणेची ही लाट मोठी जबरदस्त आहे. या लाटेला प्रतिबंध करायचा प्रयत्न केला तर उलटा परिणाम होईल. पाश्चात्य ज्ञानाच्या वाघिणीचे दूध पिऊन समाजसुधारणेच्या नव्या युगधर्माची प्रतिष्ठापना करणाऱ्या ज्या लाटा ठिकठिकाणी निर्माण होत आहेत त्याचे केंद्रीकरण होत असल्याचे दृश्य स्वामीजीनी पाहिले होते आणि हे केंद्रीकरण थोपवून धरणे आता कुणाच्या हातात रहाणार नव्हते. जे विरोध करतील त्यांच्यावर प्रतिगामीत्वाचा शिक्का बसणार होता आणि धर्मपीठानाही ही नवी प्रचंड लाट थोपवून धरणे कठीण होणार होते. या नव्या विचारांना प्रतिबंध करण्यात धर्मपीठेच वाहून जाण्याचा धोका होता. स्वामीजींना हे सर्व जाणण्याची, भविष्यात डोकावून पहाण्याची शक्ती होती. म्हणूनच आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात इंदिराकांतस्वामीनी सुधारणावादाशी नव्हे तर काळाशी तडजोड केली, सनातन धर्माचे नव्याने मूल्यमापन केले आणि आपल्या उपदेशांतून व प्रवचनातूनही आपल्या दीर्घ चिंतनातून निर्माण झालेल्या नव्या नवनीताबद्दल संशयवादी बनलेल्या काळातही आपली धर्मपीठे शाबूत राहिली आहेत.
शके १८१४ आषाढ शु. ७ मी दिवशी श्रीपद्मनाभतीर्थांनी समाधी घेतल्यावर बारा दिवसांनी म्हणजे आषाढ वद्य ३ ला (दि. १३ जुलै १८९२) श्रीमदिंदिराकांततीर्थ याना पट्टाभिषेक करण्यात आला. त्यांची कारकीर्द ५० वर्षाइतकी दीर्घ मुदतीची झाली. ही कारकीर्द सुखासीनतेची नव्हती, शांततेची नव्हती तर वादळी होती. ज्या प्रश्नांना पूर्वीच्या कोणत्याही आचार्यांना तोंड द्यावे लागले नाही, असे बिकट प्रश्न श्रीइंदिराकांतस्वामींच्या समोर उभे राहिले. हे प्रश्न अनेक प्रकारचे होते. बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे ते निर्माण झाले होते. स्वकीय समाजात जे धर्ममालिन्य निर्माण झाले होते त्यांची खंतही स्वामींना वाटत होती. ते नाहीसे व्हावे आणि समाजात नवविचारांनी जी उलथापालथ होऊ लागली होती तिच्यांतून मार्ग काढावा म्हणून जनसंपर्काचा प्रभावी उपाय त्यांनी अंमलात आणला. पूर्वीच्या कुणाही आचार्यांनी केला नाही इतक्या वेळा स्वामीजींनी संचार केले. एकूण पंचवीस वेळा दिग्विजयासाठी म्हणजेच जनकार्यासाठी ते मठाबाहेर पडले. जिथे जिथे स्वकीय समाजाची वस्ती होती तिथे तिथे गेले. पीठाधिष्ठित झाले त्याच वर्षी त्यांनी पहिला संचार केला आणि अखेरचा पंचवीसावा संचार समाधिस्थ होण्यापूर्वी फक्त सहा महिने झाला. स्वामीजींनी केलेले संचार म्हणजे धर्माच्या पुनःस्थापनेसाठी केलेली एक अखंड यात्रा होती. तो एक धर्मयज्ञ होता. ते सतत पन्नास वर्षे फिरतीवर होते असे नव्हे. पर्तगाळी मठात त्यांचे वास्तव्य होते आणि अधुनमधून ते दिग्विजयासाठी बाहेर पडत. पण मठात असतानासुध्दा - त्यांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आणि काही तरुण मंडळी सुधारणेची बाजू स्वामीजींना पटवून देण्यासाठी येत. काही लोक ग्रामण्ये उरकून काढून स्वामींचा निर्णय मिळविण्यासाठी येत. स्वामीजी सर्वांशी खेळीमेळीने वागून निर्णय देत. मार्ग काढीत, चर्चा करीत. हाही एक वाग्यज्ञ असे, धर्मयज्ञ असे.
श्रीइंदिराकांततीर्थ स्वामींनी जे पंचवीस संचार केले त्यांची दोन प्रकारात वर्गवारी करता येते. वर सांगितल्याप्रमाणे समाजात जे धर्ममालिन्य आले होते ते नष्ट करण्यासाठी म्हणून त्याची बहुसंख्य संचार केले. या संचारात त्यांनी दक्षिण व उत्तर कानडा जिल्ह्यातील अनेक गावे, मलबार प्रांतातील कालिकत, कासारवणे वगैरे शहरे गोव्यातील बहुतेक महत्त्वाचे गाव, घाटावर शहापूर, बेळगांव, हल्याळ, कोल्हापूर, गोव्याच्या उत्तरेस दक्षिण कोंकणातील शिवाय इतर कोंकणात राजापूर, रत्नागिरी आणि मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर बहुसंख्येने स्वकीय समाज राहात असलेल्या गावी त्यांनी अनेक वेळा संचार केला.
याशिवाय भारतात सर्वत्र भ्रमण करून त्यांनी पुण्यक्षेत्रांच्या यात्रा केल्या. तिरुपती, तिरुचनापल्ली, मदुराई, विष्णुकांची, शिवकांची, रामेश्वर, धनुषकोडी, कन्याकुमारी, अनंतपूर, गुरुवायूर, उडुपी, गोकर्ण सारखी दक्षिणेतील पुण्यस्थळे त्यांनी पाहिली. कोंकणातील पुळेगणपती, चिपळूणचा परशुराम आणि मग कोल्हापूरची अंबाबाई, पंढरपूर येथे विठोबांचे दर्शन घेऊन उत्तर भारतात गेले. मथुरा, वृंदावन, हरिद्वार, हृषिकेश, प्रयाग, काशी, गया, अयोध्या, वगैरे पुण्यक्षेत्रे, मध्यभागातील क्षिप्राकाठ, उज्जयिनी, गोमती, पूर्वेला जगन्नाथ आणि पश्चिमेला अकोला, गिरनार, सोमनाथ, ब्दारका अशी भारतातील जवळजवळ सर्व तीर्थस्थाने आणि शहरे यांना भेटी दिल्या. स्वामीजी हिमालयावर गेल्याशिवाय कसे राहतील? त्यानी बद्रीनारायण, बिल्वकेदार, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग या सर्व स्थळांना भेटी दिल्या. विस्तृत गोकर्ण पर्तगाळी मठाच्या इतिहासात यात्रा केलेले महान यति म्हणून गणले जातात.
शके १८६४ चा रामनवमीचा उत्सव पूर्ण झाला आणि नंतर तरुण मंडळीचा नाट्योत्सव सुरू झाला. मंडळींच्या आग्रहानुसार दरवर्षप्रमाणे गुरु व शिष्य स्वामी थोडा वेळ नाटकाला बसत. त्या दिवशी सिंहाचा छावा नाट्यप्रयोग होता. स्वामीजी आसनावर बसले आणि थोड्या वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अंगात उष्णता वाढू लागली ते शय्यागृहात गेले. ताप खूपच वाढला.
दुसऱ्या दिवशी स्नान, पूजादि विधी केले. भिक्षेनंतर रक्तयुक्त ओकारी आली. सर्वत्र बातमी पसरली. लांबलांबच्या ठिकाणाहून अनुयायी येऊ लागले.
चैत्र वैद्य ७ मी दिवशी थोडा आराम वाटला. पण जाण्यापूर्वी दिवा मोठा व्हावा तसा तो प्रकार होता. संध्याकाळी प्रकृति एकदम बिघडली. रात्री १२ वाजता श्रीरामदेवमंदिरांत स्तंभाला टेकून बसविण्यात आले. वेद घोष व गीतापठण चालू झाले. ज्यांची भक्ती केली त्या सर्वसमर्थ रामदेवाच्या आणि ज्यांची प्रीति केली त्या विशाल मानव समाजाच्या सान्निध्यांत आचार्यांनी या पृथ्वीचा संपर्क सोडून वैकुंठ लोकांत गमन केले!
अशा या ५० वर्षांची दीर्घ आणि चिरस्मरणीय कामगिरी करून लोकप्रिय झालेल्या आचार्याचे अवसान शके १८६४ (इ.स. १९४२) च्या चैत्र वद्य ७ मीस पर्तगाळी मठांतच झाले.

वेदवेदान्तर्कादिशास्त्रज्ञो यो निरोदनः ।
तं श्रीमदिन्दिराकान्ततीर्थं वन्दे तपोनिधिम् ॥