Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

द्वारकानाथ तीर्थ

जन्मस्थळ : गंगोळ्ळी (उडुपी जिल्हा)
जन्मनाम : गोविंद रामनाथ आचार्य
जन्मतिथी : श्रीशके १८४१ सिधार्थ संवत्सर ज्येष्ठ कृष्ण ८मी शनिवार (२१/०६/१९१९)
संन्यासदीक्षा : श्रीशके १८६४ चित्रभानु संवत्सर वैशाख कृष्ण ८मी गुरुवार (०७/०५/१९४२)
दीक्षास्थळ : पर्तगाळी मठ
दीक्षागुरु : श्रीकमलानाथ तीर्थ (२१)
गुरुपीठारोहण : श्रीशके १८६५ सुभानु संवत्सर चैत्र कृष्ण ८मी मंगळवार (२७/०४/१९४३)
शिष्यस्वीकार : श्री विद्याधिराज तीर्थ (२३)
महानिर्वाण : श्रीशके १८९४ परिधावी सं फाल्गुन कृष्ण ६ रविवार (२५/०३/१९७३)
वृंदावन स्थळ : पर्तगाळि मठ
शिष्यकालावधी : ००वर्ष ११ महिने २० दिवस
गुरुपीठकालावधी : २९ वर्ष १० महिने २६ दिवस
मठसेवाकालावधी : ३० वर्ष १० महिने १८ दिवस
आयुर्मान : ५३ वर्ष ०९ महिने ०४ दिवस
मठस्थापना : १) मल्यर मठ गंगोळ्ळि (हस्तांतर) १६/०३/१९४५
२) श्री राममंदिर वडाळा मुंबई ०७/०२/१९६५
३) द्वारकानाथ भवन बेंगळूरु २४/०९/१९५७
४) श्री इंदिराकांत भवन वास्को १५/०५/१९६३

श्रीमद् द्वारकानाथतीर्थ स्वामीजींचा जन्म उडुपी जिल्ह्यांतील गंगोळी गांवत झाला. या गावात सेनापूर आचार्य नावाचे एक प्रसिद्ध पंडित घराणे आहे. नगर संस्थानचे दिवाण नारायण महाले या सारस्वत ब्राह्मणाने गंगोळी गावी वेंकटरमण देवस्थानची स्थापना करून, पूजाअर्चेच्या कामासाठी या घराण्याची नियुक्ती केली होती
श्रीव्दारकानाथतीर्थांच्या कारकीर्दीत या घराण्याने हे देवस्थान श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या स्वाधीन केले. या सेनापूर आचार्य घराण्यातील विव्दान वैदिक रामनाथाचार्य व त्यांच्या पत्नी भवानीबाई यांचे पुत्ररत्न म्हणजेच गोकर्ण पर्तगाळ मठाचे २२ वे आचार्य श्रीमद व्दारकानाथतीर्थ होत. त्यांचा जन्म शके १८४२ वर्षी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव गोविंदाचार्य. गोविंदाचार्यांचे कानडी व इंग्रजी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते संस्कृत शिक्षणाकडे वळले. त्यांचे ब्रह्मकार्यात योग्य असे वैदिकी शिक्षण त्यांच्या वडिलानी करून घेतलेले असल्यामुळे लहानपणीच संस्कृतची ओळख त्यांस झालेली होती. परंतु संस्कृत भाषा, काव्य, व्याकरणादि शास्त्रे शिकण्यासाठी ते कार्कळ येथील श्री भुवनेंद्र संस्कृत महाविद्यालयात काही काळ राहिले व मग श्रीइंदिराकांत स्वामींच्या अध्यापनाचा लाभ मिळावा म्हणून पर्तगाळी मठात आले. या ठिकाणी वेद, वेदांगे, न्याय, मीमांसा आदि शास्त्राचे व विविध दर्शनाचे त्यांचे अध्ययन श्री इंदिराकांततीर्थ व श्री कमलानाथतीर्थ यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली झाले. त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला.
श्री इंदिराकांत स्वामी यांना माणसे पारखण्याची विलक्षण शक्ती होती. आपले नरहरीतीर्थ व कमलानाथतीर्थ हे दोन्ही शिष्य त्यांनी पारखून निवडून घेतले होते. आपल्या पाठशाळेत विद्या संपादन करणाऱ्या गोविंदाचार्य या मुलाचे अनेक गुण पाहून त्यांनी आधीच त्याची आपले प्रशिष्य म्हणून निवड केली होती आणि वेळ येताच कमलानाथतीर्थ यांचाकडे आपली इच्छा व्यक्त करून ठेवली.
श्रीइंदिराकांततीर्थ स्वामींचे निर्वाण झाल्यावर एका महिन्यानंतर शके १८६४ च्या वैशाख वद्य ७ मी (दि. ७ मे १९४२) रोजी पर्तगाळ मठात त्यांस श्रीकमलानाथतीर्थ स्वामीनी आश्रमदीक्षा दिली व त्यांचे श्रीद्वारकानाथतीर्थ असे नामकरण केले. यावेळी त्यांचे वय २२ वर्षाचे होते. एका वर्षांनंतर गुरुस्वामीचे निर्वाण झाल्यावर शके १८६५ सुभानु संवत्सराच्या चैत्र वद्य अष्टमीस (दि. २७ एप्रिल १९४३) त्यांस पट्टाभिषेक करण्यात आला.
शके १८६५ ते १८९४ हा तीस वर्षांचा श्रीद्वारकानाथ तीर्थांच्या कारकीर्दीचा काळ. हा काळ धार्मिक व सामाजिकदृष्ट्या श्रीइंदिराकांततीर्थांच्या काळासारखा वादळी नव्हता. उलट या क्षेत्रातील सारी वादळे शांत होऊन क्षुल्लक कारणांमुळे ग्रामण्ये निर्माण होण्याचा व स्वामीनी हस्तक्षेप करून रायस देण्याचा काळ केव्हाच मागे पडला होता. समाजाची सामाजिक व भौतिक प्रगति झपाट्याने होत चालली होती. सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना मागे पडल्या होत्या. 'अष्टवर्षात्भवेत्कन्या' हा स्मृतीचा आदेश लोक विसरून गेले होते आणि मुलामुलीची लग्नाची वये वाढली होती. उपनयनाचा संस्कार एक बाब म्हणून शिल्लक राहिली होती. परदेशगमन सर्रास होत होते. कोणत्याही जातींत अन्नग्रहण केले जात होते. मिश्रविवाह, पुनर्विवाह आणि क्वचित् आंतर्धर्मीय विवाह होऊनही कुणी बहिष्कृत होत नव्हते. सारस्वत हे त्रिकर्मी आहेत की षट्कर्मी याची चिंता कुणी करीत नव्हते. स्वामीजींकडून मुद्राधारण करून घेतले पाहिजे आणि स्नानोत्तर संध्या केली पाहिजे या गोष्टी देखील विसरल्या गेल्या होत्या. - पण हे सर्व होऊनही सारस्वत ब्राह्मणात आणि अर्थातच वैष्णव सांप्रदायिकात धर्मिक भावनांचा लोप मात्र झाला नव्हता. कर्मकांडाच्या बंधनातून समाज सुटत होता. पण धर्मतत्त्वाचा पगडा कायम होता. म्हणूनच सारस्वतांची सर्व देवस्थाने यथापूर्व वैभवाने चालू होती आणि धर्मपीठेही कार्यरत होती. पीठाधीशांचा धार्मिक अधिकार समाजाला मान्य होता आणि श्रीव्दारकानाथतीर्थांसारखे विव्दान व समाजहितैषी पीठाधीश असले तर त्यांना समाजाचा आदर व प्रेमही लाभत होते. काळाची पाऊले ओळखून धर्मपीठांनी वर्तन करणे हाच या नव्या काळाचा युगधर्म होता. हा युगधर्म श्रीव्दारकानाथ स्वामीनी पाळला, समाज व धर्मपीठ यांच्यात विचारांची व परकेपणाची दरी राहू नये म्हणून त्यानी प्रयत्न केला. आपल्या मठाच्या अनुयायांचेच नव्हे तर एकूण समाजाचे कल्याण करण्याच्या योजना आंखल्या आणि म्हणूनच मुक्ततेच्या अश्रध्द काळातही त्यानी समाजाकडून आदर मिळविला.
एकाद्या प्रतिभासंपन्न समाज धुरिणाप्रमाणे हे स्वामीजी कल्पक होते आणि एकाद्या कर्तबगार संचालकाप्रमाणे ते आपल्या कल्पना अंमलात आणीत. पर्तगाळ व मुंबई येथे संस्कृत पाठशाला, पर्तगाळ येथे एक हायस्कूल व संस्कृत भाषेला व भारतीय तत्वज्ञानाला प्राधान्य असलेले महाविद्यालय, धार्मिक ग्रंथ प्रकाशित करणारी प्रकाशनसंस्था, वैदिकी व भिक्षुकी करण्यासाठी योग्य तेवढे शिक्षण देणारी पाठशाळा, ठिकठिकाणी असलेल्या जुन्या मठांची डागडुजी व नव्या ठिकाणी नव्या मठांची उभारणी, अशा कित्येक योजना त्यानी मनाशी योजल्या व त्या दिशेने पूर्वतयारी चालविली. प्रकृतीचे अस्वास्थ्य नेहमीच पाठीशी असले तरी स्वामीजींनी आपल्या कल्पना साकार करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक संचार केले. आपल्या पारदर्शक स्वभावाने व गोड वाणीने लोकसंग्रह केला. निरनिराळ्या कार्यासाठी लाखो रुपयांचे निधी उभारून ते त्या त्या कार्याकरता खर्च केले. त्यांच्या कारकीर्दीत निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन आणि मुत्सद्देगिरी वापरून मठाचे हितरक्षण करीत त्याची व त्याच्या कार्याची वाढ करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पराकाष्ठा केली. हे काम करतांना फक्त मठानुयायी सांप्रदायिकांचेच सहकार्य घेतले असे नव्हे, तर स्मार्त पुढाऱ्यांचे आणि परजातीतील आणि परधर्मातील नेत्यांचेही सहाय्य मिळविले.
पर्तगाळ येथे कॉलेज काढण्याची त्यांची कल्पना गोमंतक मुक्तीनंतर पुन्हा एकदा उसळी घेऊन उठली; पण ती अनेक अडचणीमुळे अंमलात येऊ शकली नाही. आपला समाज धार्मिकदृष्ट्या विस्कळीत आहे कारण आपली धर्मपीठे विस्कळीत आहेत. त्यांच्यात प्रथम सामंजस्य निर्माण केले पाहिजे. शैव, वैष्णव, द्वैत, अद्वैत, विशिष्टाव्दैत, गौड, द्रविड अशा अनेक प्रकारच्या भेदांनी समाज व धर्मपीठे यांची संकुचित अभिमानामुळे फारकत झाली. त्यांच्यात प्रथम एकी केली पाहिजे. तसे केल्यानेच हिंदू धर्माला आजच्या स्थितीतही तेज चढेल असे त्यांचे विचार होते. हे विचार कृतीत आणण्यासाठी त्यांनी पाऊलही उचलले.
सारस्वतांतील वैष्णव पोटभेदाचे जे गोकर्ण पर्तगाळ व काशी असे दोन मठ आहेत, त्यांच्यातील वैमनस्य श्रीइंदिराकांत स्वामीच्या काळात नष्ट होऊन ह्या दोन्ही मठांचे पीठाधीश अधिक जवळ आले होतेच. श्रीव्दारकानाथ तीर्थानी हे सूत्र पुढे नेले. त्यानी उडुपीच्या द्रविड अष्टमठांपैकी काही पीठाधीशांच्या भेटी घेतल्या. श्रृंगेरी, कुडली आणि सारस्वतातील स्मार्त सांप्रदायापैकी चित्रापूर पीठाधीशांशी संपर्क जोडला आणि समाजातील धर्म व संस्कृतीविषयक उदासीनता कशी नष्ट करता येईल याबद्दल विचारविनिमय केला. मठांमठांत वैमनस्य असू नये यावर भर दिला. श्रीक्षेत्र उडुपी येथे मध्वतत्वज्ञान परिषद भरली होती. त्यात त्यांनी भाग घेऊन समन्वयाचे हेच धोरण पुढे रेटले. सन १९५६ साली याच परिषदेचे चौथे अधिवेशन कोईमतूर येथे भरले होते. या परिषदेचे उद्घाटन करताना त्यांनी जी संस्कृत व कन्नड भाषणे केली ती फार गाजली. १९५४ च्या ६ व ७ नोव्हेंबरला मुंबई येथे सुंदराबाई हॉलमध्ये जैनमुनी श्री सुशील कुमारजी भास्कर यांच्या प्रयत्नाने विश्वधर्मपरिषद भरली होती. मुंबईचे मुख्य प्रधान मोरारजी देसाई हे उद्घाटक होते. मुस्लीम, ख्रिस्ती, बौध्द, पारशी, शीख इ. धर्म आणि हिंदू धर्मातील अनेक पंथांचे आचार्य यांची आपापल्या धर्म व पंथाबद्दलची भाषणे या परिषदेत झाली होती. त्यात वैष्णव पंथातर्फे श्रीव्दारकानाथतीर्थ स्वामींनी भाग घेऊन भाषण केले. स्वामीजींनी केलेले तें एक अप्रतीम भाष्य होते. या भाषणात हिन्दू धर्माची तत्वे विशद केली. वेगवेगळ्या पंथातील भेद सांगितले. वैष्णव संप्रदायाची माहिती दिली. पण या सर्वापेक्षा समाजास धर्माची गरज का आहे. धर्माला शास्त्राची जोड का दिली पाहिजे, यावर विवरण करून गीताग्रंथ हा सर्व मानव जातीला आदर्श ठरणारा ग्रंथ कसा आहे. याविषयी यावेळी धार्मिक विश्लेषण केले.
श्री द्वारकानाथतीर्थ स्वामीजींच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय ठरेल अशी एक घटना म्हणजे त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील तीन महत्त्वाच्या शहरात नव्याने निर्माण केलेल्या तीन मठांची उभारणी. यापूर्वीच्या कोणत्याही आचार्यांची तीन मठांची स्थापना आणि शिवाय पर्तगाळी मठाची सुधारणा अशा प्रचंड गोष्टी केल्याची नोंद नाही. मुंबई, बेंगळूरु आणि वास्को या तीन शहरांत गोकर्ण पर्तगाळी संस्थानचे तीन मठ बांधण्याची कल्पनाच आर्थिकदृष्ट्या एवढी महत्त्वाकांक्षी होती की ती हातात घेणे हे मोठे धाडस ठरणार होते पण श्री व्दारकानाथतीर्थांनी ती हातात घेतली आणि अवघ्याच काळात तडीला नेली, आणि तीही प्रकृतीचे अस्वास्थ्य मागे लागले असताना. मुंबईचा एक मठ म्हणजे एक नव्हे, दोन नव्हे दहा पंधरा लाख रूपयांची (त्याकाळी) योजना! खुद्द संस्थानकडे अशा जादा कार्यासाठी खर्च करायला निधी नव्हता. अनुयायांकडून कितपत मदत मिळेल याची शंका. फक्त दोनच गोष्टी अनुकूल होत्या. त्या म्हणजे स्वामीजींची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांची लोकसंग्रहाची अपवादात्मक वृत्ती. या दोन गोष्टींमुळेच स्वामीजी ही प्रचंड कार्ये उभारूं शकले.
१९५० साली स्वामीजी मुंबईला आले. यावेळी संचार हे सर्वसामान्य कारण असले तरी त्यांच्या कण्याला झालेल्या दुखापतीचे निदान करून उपाययोजना करणे हा ही एक हेतु होता. स्वामीजींचा व त्यांच्या परिवाराचा मुक्काम स्वताःचा मठ नसल्याने वाळकेश्वरमधील काशीमठात होता. मठानुयायांना त्यांच्या दर्शनासाठी जाणे आडचणीचे जात होते.
एक दिवस स्वामीजींच्या मनांत आले मुंबई शहर हे सारस्वतांचे गोव्यानंतर दुसया क्रमाकांचे केंद्र. या ठिकाणी मध्यवर्ती जागेत संस्थानचा मठ असावा. पण संस्थानचा अधिपती म्हणजे हुकूमशहा नव्हे. पीठाधिपतींच्या मनात आले आणि हुकम दिला अशी संस्थानची परंपरा नव्हती. महत्त्वाच्या गोष्टीचा अनुयायांच्या बैठकीत खल करून निर्णय घेणे ही संस्थानची परंपरा होती आणि त्यातल्या त्यात श्री व्दारकानाथतीर्थ स्वामीची वृत्ती तर लोकशाहीची आणि लोकानुरंजनाची होती. त्यांनी मुंबईतील आपल्या संस्थानच्या अनुयायानाच नव्हे तर काशी व कवळे मठाच्या अनुयायांनाही बोलावून घेतले व त्यांच्या समोर हा प्रश्न ठेवला. मुंबई सारख्या सारस्वतांची मोठी संख्या असलेल्या शहरात स्वकीय समाजाच्या लग्न मुंजीसारख्या व इतर सांस्कृतिक कार्यांना जागा नाही. संचाराच्यावेळी आचार्यांना रहायला मध्यवर्ती ठिकाणी जागा नाही, वगैरे मुद्दे मांडून अशा एखाद्या इमारतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जमलेल्या सर्वानीही ती कल्पना उचलून धरली आणि एक इमारत समिती स्थापन करण्यात आली.
या ठिकाणी एक विशेष गोष्ट सांगितली पाहिजे. मुंबईत सारस्वतांची खूप मोठी संख्या होती ही गोष्ट खरी. परंतु हा समाज एकजिनसी नव्हता. त्यांच्यात काशी, गोकर्णपर्तगाळ, कवळे, चित्रापूर, दाभोळ आदि मठानुसार पंथभेद होते. तसेच मुंबईकर, गोवेकर, वाडकर, कर्नाटकी असे प्रदेशभेद होते. हे सर्व लोक एका व्यासपीठावर त्यापूर्वी कधीही एकत्र आले नव्हते. पूर्वी मुंबईत सारस्वतांच्या सार्वजनिक मालकीची जी देवस्थाने होती ती मुंबईकरांच्या ताब्यात होती. या मुंबईकरांतही पगडीवाले किंवा बारघरे आणि फेटेवाले असे जे दोन प्रकार होते (पगडीवाले म्हणजे पहिल्या प्रथम जी बारा घराणी कोंकणातून मुंबईला गेली आणि जी पगडी वापरीत ती आणि फेटेवाले म्हणजे नंतर मुंबईला जाऊन रुमाल वापरायला लागली ती) त्यांच्यापैकी पगडीवालेच या देवस्थानांचा कारभार करीत. नंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत जाऊन या देवस्थानाची मालकी मुंबईतल्या सर्व सारस्वतांची आहे असा कोर्टाने निकाल दिला. तरी सुध्दा मालवणकर, वाडकरांशिवाय इतरांनी या देवस्थानांच्या कारभारात विशेष लक्ष घातले नाही. त्यामुळे मुंबईतला एकूण सारस्वत समाज एकत्र असा कधी आला नाही.
या सर्व गटांना मठस्थापनेच्या निमित्ताने श्री व्दारकानाथतीर्थांनी पहिल्या प्रथम एकत्र आणले. जी इमारत कमिटी स्थापन केली त्यात मुंबईकर, वाडकर, गोवेकर, कर्नाटकी या सर्वांचाच समावेश केला. त्यात बडे सरकारी अधिकारी होते, तसे उडुपी हॉटेलाचे मालक होते. डॉक्टर, वकील होते तसे व्यापारी होते. पुढारी होते तसे कार्यकर्ते होते. सर्व थरातल्या सारस्वत व्यक्ती एकत्र आल्यामुळे यावेळी एकतेचे एक नवे वातावरण निर्माण झाले.
मठासाठी जागा निवडण्याचा प्रश्न पुढे आला तेव्हा मठ मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असावा यावर एकमत झाले. पण गिरगाव सारख्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात जागा मिळणे कठीण होते. वडाळाच्या जागेचा विचार झाला, तेव्हा त्या ओसाड जागेत मठ बांधायला बऱ्याच लोकांचा विरोध होता. पण मुंबई शहराचे केंद्र उत्तरेकडे झुकत आहे हे लक्षात घेऊन स्वामीजींनी स्वतः ही जागा निवडली. पन्नास वर्षापूर्वीची वडाळ्याची ही ओसाड जागा आज ओसाड राहिलेली नसून दादर, वडाळा हा भाग आता बृहन्मुंबईचे केंद्र समजले जात आहे. लग्नमुंजी, सभासंमेलने, परिषदा अशा कार्यक्रमाची गरज भागविली जात आहे. स्वतः स्वामीजी व त्यांच्या परिवाराला स्वतंत्र निवासस्थान त्यात आहे. ग्रंथालय आहे, अनेक कुटुंबाना रहाण्याची सोय झाली आहे. मठांत राम मंदिराची स्थापना झाली आहे, आणि अशा प्रकारे मुंबईत हे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून आज ख्यातनाम झाले आहे. समारंभप्रसंगी शिलान्यास स.का. पाटील यांनी एक सुंदर भाषण करून या मठाविषयी जी भव्य स्वप्ने बोलून दाखविली होती ती आज साकार झालेली दिसत आहेत.
ज्या मठासाठी जागा विकत घेऊन तिचा पायाभरणी समारंभ शके १८७२ मार्गशीर्ष शु. १३ दि. २२ डिसेंबर १९५० या दिवशी झाला. पुढे चार वर्षे वर्गणी जमा करून इमारत समितीने बांधकाम चालू केले. आणि इमारतीचा एक भाग पूर्ण होताच शके १८७६ माघ शु. ९, दि. २ फेब्रुवारी १९५५ रोजी इमारतीचे मोठ्या थाटाने उद्घाटन करण्यात आले. काशी मठाचे पीठाधीश श्रीमत्सुधींद्रतीर्थ यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले होते.
या मठांत तसेच डिचोलीच्या मठात संस्कृत पाठशाला उघडून संस्कृत विद्येचा प्रसार व्हावा हा श्रीव्दारकानाथतीर्थ यांचा एक उद्देश होता. त्यासाठी श्रीस्वामीनी संस्कृत शिक्षण प्रसार समिती नांवाची विव्दानांची एक समितीही नियुक्त केली होती. एक विशेष गोष्ट म्हणजे या शिक्षणकार्यासाठी निधी गोळा करण्याकरता दि. ५ ते १२ फेब्रुवारी पर्यंत मठाच्या उद्घाटन समारंभास जोडून एक सांस्कृतिक कार्यक्रम श्रीस्वामीजींच्या प्रेरणेने समितीने घडवून आणला होता.
मुंबईच्या मठाचे राहिलेले बांधकाम नंतर ५-६ वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाले आणि स्वामीजींचे स्वप्न त्यांच्या इच्छेनुसार साकार झाले. पण एवढ्यावर ते स्वस्थ बसले नाहीत. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकाच्या राजधानीतही आपला मठ असायला हवा ही त्यांची आणखी एक महत्त्वाकांक्षा होती. या कामाला मग ते ताबडतोब लागले. बंगळूर शहरातील बसवनगुडी भागात कृष्ण राजेंद्र रोडवर इमारतीसह एक जागा त्यांनी खरेदी केली (१९५० A.D.).
या मठाच्या निर्मितीशिवाय खुद्द पर्तगाळ मठात जीर्णोध्दाराची काही कामे स्वामीजीनी केली. श्री रामदेव मंदिराचा घूड जीर्ण झाला होता. त्याचा जीर्णोध्दार करून सबंध छपरास त्यानी तांब्याचा पत्रा बसवून घेतला आणि शिखरास सुवर्णकलश बसविला आणि हे काम पूर्ण झाल्यावर शके १८८७, विश्वावसु संवत्सर, माघ शुध्द १५, दि. ५ फेब्रुवारी १९६६ या दिवशी श्री राम, सीता व लक्ष्मण या मंदिरातील त्रिमूर्तीची पुनःप्रतिष्ठा केली. पुनप्रतिष्ठेचा हा सोहळा पांच दिवसपर्यत चालला होता.
श्रीस्वामीजींच्या कारकिर्दीचा तीस वर्षाचा काळ धार्मिक व सामाजिक दृष्ट्या शांततेचा होता. पण राजकीयदृष्ट्या मात्र तो फार अस्वस्थतेचा होता. ही राजकीय अशांतता, अस्वस्थता व अनिश्चित भवितव्यता गोव्याबाहेर व गोव्यात दोन्ही ठिकाणी चालू असलेली. युध्दकालीन परिस्थिती, भारताला झालेली स्वराज्य प्राप्ती, गोव्यांतील स्वातंत्र्याचे आंदोलन, त्यातून उद्भवलेले भारत - गोवा सरकारमधील वितुष्ट, माल वहातूक बंदी, प्रवासबंदी या सर्व गोष्टींचा गोकर्ण - पर्तगाळ मठाच्या आर्थिक व अनुयायी संपर्क आदि गोष्टीवर परिणाम झालाच आणि संस्थानला एका मोठ्या दिव्यातून जावे लागले. गोकर्ण मठाचे अनुयायी फक्त गोव्यातच नव्हते. ते गोव्याबाहेर कर्नाटक व महाराष्ट्रातही लाखोच्या संख्येने होते. गोव्याबाहेर असलेल्या या लोकांची आर्थिक मदत संस्थानला येत होती. संस्थानचे अनेक मठ गोव्याबाहेर होते व त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण होऊन बसले होते. संचारासाठी पूर्वीप्रमाणे सुलभपणे सर्वत्र फिरणे कठीण झाले होते.
पण या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही स्वामीजींनी संस्थानचा कारभार मोठ्या कुशलतेने केला. आर्थिक तूट येत होती. पण तरीही काही ठिकाणे त्यानी विकत घेतली व काही दान म्हणून घेतली. गुरुस्वामींच्या कारकीर्दीतील संख्येपेक्षा ही संख्या पुष्कळ कमी होती खरी. परंतु संस्थानच्या योगक्षेमाकडे व्दारकानाथतीर्थानी दुर्लक्ष न करतां जिद्दीने प्रयत्न केला, हे सांगण्यापुरताच या ठिकाणी या मुद्याचा उल्लेख केला आहे.
१९५३ साली पोर्तुगालचे वसाहतीमंत्री सार्मेत रूद्रीगिश गोव्याला आले, तेव्हा त्यांनी पर्तगाळी मठाला आवर्जून भेट दिली व मठाविषयीची सर्व माहिती मिळविली होती. पोर्तुगालला परत गेल्यावर त्यानी २३ जानेवारी १९५४ रोजी लिस्बनहून एक 'देक्रेत' काढून कवळे व गोकर्ण पर्तगाळ मठाचे स्वामी हे त्या त्या धार्मिक मठाचे प्रतिनिधी असून त्यांना मूर्ती, मानचिन्हे व पूचाअर्चेस लागणारे सामान आयात केल्यास त्यास जकात लागू करू नये असा हुकूम दिला.
१९७३ च्या मार्च महिन्यात ते असेच कानडा जिल्ह्यात संचाराला गेले होते. दि. २५ मार्च रोजी धर्मस्थळ या दक्षिण कानडातील गावात बाहुबली प्रस्थान सोहळ्यासाठी स्वामीजी गेले होते. तेथील पूजाविधी वगैरे कार्यक्रम उरकून ते रात्रौ अंकोले गावात वसतीला आले. त्या दिवशी त्यांचा रक्तदाब फार वाढला होता. पण त्याची चिंता न करता ते धर्मस्थळात गेले होते.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गोव्यात बांदोडे येथे गौड सारस्वत ब्राह्मण समाजात होणाऱ्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनास त्यांना उपस्थित रहायचे होते. म्हणून त्या दिवशी म्हणजे दि. २५ मार्च रोजी (शके १८६४ परिधावी संवत्सर फाल्गुन वद्य ६, रविवार) अंकोले मठात वस्तीला असलेल्या स्वामीजीनी पहाटे उठून जपजाप्य, देवपूजा, नैवेद्य काढून व स्वतः भिक्षा घेण्याचा कार्यक्रम उरकून सव्वादहा वाजता स्वामीजी मोटारीत बसण्यासाठी मठाबाहेर पडले. पर्तगाळीला जाऊन व थोडी विश्रांती घेऊन पुढे बांदोड्याला जावे असा कार्यक्रम त्यांनी आंखला होता. परंतु मोटारीत चढण्यापूर्वीच त्यांची शुध्दि हरपली व ते खाली पडले. ताबडतोब उपचार केले. पण उपचारांना यश न येता दहाच मिनटानी म्हणजे १०-२५ वा. त्यांचे निर्वाण झाले.
ही दु:खद वार्ता पी.टी.आय.ने व तारा टेलिफोनने सर्वत्र पसरवली. गोव्यातून कर्नाटकातून हजारो लोक अंकोल्याला मिळेल त्या वाहनाने जाऊ लागले कारण त्यांना अंकोल्यालाच वृंदावनस्थ करण्यात येईल असा लोकांचा समज होता. शिष्यस्वामी श्री विद्याधिराजतीर्थही खास मोटारीने अंकोल्याला रवाना झाले.
अंकोला निवासी शिष्यवर्गाचा श्रीव्दारकानाथतीर्थ स्वामींस अंकोला मठात समाधिस्थ करावे असा मनोदय होता. कारण त्या मठात श्रीदिग्विजय रामचंद्रतीर्थ, श्रीरमाकांततीर्थ आणि श्रीभूविजय रामचंद्रतीर्थ हे स्वामी दिवंगत झाले आणि त्याच मठात त्यांस समाधिस्थ करण्यात आले. पण श्रीव्दारकानाथतीर्थ स्वामी पर्तगाळ मठात जाण्यास निघाल्यावेळी त्यांचे महा निर्वाण झाल्याने पर्तगाळ मठातच त्यांना वृंदावनस्थ करणे योग्य असे शिष्यस्वामीनी सांगितले. वरून अंकोलेकर यांना जड अंतःकरणाने आपली मान्यता देणे क्रमप्राप्त झाले. बाकी वृंदावनस्थ विधीस लागणाऱ्या सर्व सामानाची व्यवस्था अंकोलेकरानी केली होती म्हणे. ते सर्व सामान मग पर्तगाळी मठात आणण्यात आले.
लगेच स्वामींचा पार्थिव देह एका उघड्या जीपवर कमलासनाने ठेवण्यात आला आणि अनेक लोकांसह जीप रामनामाच्या गजरात रात्री १० घंटे ४५ मिनिटावर पर्तगाळ मठात पोचली: वाटेत ठिकठिकाणी शेकडो लोकांनी साश्रु नयनानी त्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले.
गोव्यात व इतरत्र श्री व्दारकानाथतीर्थांनी इतकी लोकप्रियता संपादन केली होती की काही ठिकाणी स्वकीय समाजातील व्यापाऱ्यांनीच नव्हे तर इतरांनीही आपापली दुकाने बंद ठेवून दुःख प्रदर्शित केले. यावेळी गोवा, दमण व दीव संघप्रदेशाच्या विधानसभेचे अधिवेशन चालू होते. स्वामीजींचे निर्वाण होऊन त्यांना वृंदावनस्थ केले. त्याच दिवशीच्या बैठकीत मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी सद्गदित अंतःकरणाने शोक प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षाचे नेते डॉ. जॅक सिक्वेरा, उपनेते अनंत नरसिंह नायक आणि सरकार पक्षाचे आमदार वसंतराव जोशी यांनी प्रस्तावाला पाठिंबा देणारी भाषणे केली. सभापती फुग्रो यांनी सभासदांच्या भावनांशी सहमत होणारे भाषण केल्यावर दोन मिनिटे स्तब्ध राहून सभागृहाचे प्रस्ताव संमत केले आणि गोव्यात अलीकडच्या काळात निर्माण होऊन व समाजास उपयुक्त असे मोलाचे काम करून, नव्हे करता करताच परमात्मपदी लीन झालेल्या या संन्याशाला अखेरची आदरांजली वाहून अखिल गोमंतकातर्फे कृतज्ञता व्यक्त केली.

द्वारकानाथतीर्थानां अनुग्रहसमुद्भम् ।
विद्याधीराजयोगीशं वंदे विद्याभिवृद्धये ॥