७ श्रीमद् दिग्विजयरामचंद्र तीर्थ
दीक्षास्थळ : पर्तगाळी मठ
दीक्षागुरु : श्री रामचंद्र तीर्थ (६)
शिष्यस्वीकार : श्री रघुचंद्र तीर्थ
महानिर्वाण : श्रीशके १५९० कीलक संवत्सर माघ वद्य ९ रविवार (२५-०२-१६६९)
वृंदावन स्थळ : श्री वीरविट्ठल मठ अंकोला
गुरुपीठकालावधी : ३वर्षे ९ महिने २२ दिवस
मठस्थापना : श्री वीरविट्ठल मठ अंकोला
अलौकीक कार्य : नारायण भूताचा दिग्भंदन.
ज्यांनी पर्तगाळ मठाची स्थापना केली त्या श्रीमद् रामचंद्रतीर्थांचे श्रीदिग्वजय रामचंद्र तीर्थ हे शिष्य. शिष्य स्वीकार पर्तगाळीत झाला, पर्तगाळी मठांत झालेला हा एक पहिला मोठा कार्यक्रम ठरला. शके १५८७ मध्ये वैशाख वद्य ३ या दिवशी गुरुस्वामी श्रीमद् रामचंद्र तीर्थ रिवण मठात समाधिस्थ झाल्यावर श्रीमद् दिग्विजय रामचंद्रतीर्थांना पट्टाभिषेक करण्यात आला. यांचे वास्तव्य बहुतेक रिवण येथील मठात असे, या मठात त्यांना एक तुलसीकाष्ठाची मारुतीची मूर्ति मिळाली. ते मारुतिचे उपासक असल्यामुळे हा मूर्तिलाभ झाला म्हणून त्यांना आनंद झाला व ते ती मूर्ती तेथल्या गुहेत तपश्चर्येसाठी घेऊन गेले. तिथे त्यांनी बराच काळ घालविला. पुढे स्वकीय शिष्यमंडळीच्या विनंतीनुसार ते पर्तगाळी मठांत रहायला आले आणी या मठातच त्यांनी श्रीमद् रघुचंद्रतीर्थ यांना आश्रम देऊन शिष्य स्वीकार केला. पर्तगाळी मठात झालेला आश्रम दीक्षेचा हा पहिला समारंभ होय.
पर्तगाळ मठातील रामनवमी उत्सवासाठी श्रीरामचंद्रतीर्थांनी एक मोठा चार चक्रि रथ तयार करून घेतला. याला तेर असेही म्हणतात. श्रीरामजन्मोत्सवाचे दिवस श्री दिग्विजयरामचंद्रतीर्थ व रघुचंद्रतीर्थांनी वाढवले व चैत्र शुध्द चतुर्थिपासून या उत्सवास प्रारंभ करून दिला. गरुडपूजन, ध्वजारोहण, दंडबली, होमहवन, रथविनायकाची पूजा, रामजन्मोत्सव आणि रामनवमीच्या दिवशी देवमूर्तिस्थित रथाची मिरवणूक वगैरे उत्सवाचा तपशील आचार्यांनी ठरवून दिला होता, तो आजतागायत चालू आहे.
त्या वर्षीच्या पर्तगाळ मठांतील हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे याची पूर्वप्रसिध्दी गोव्यात व कर्नाटकात खूप झाल्यामुळे सोंदे मठाधिपतीना त्याचे वैषम्य वाटले. या दोन मठात हेगरे गावासंबंधी कित्येक वर्षे वाद होता व सरकार दरबारी तक्रारी जाऊन त्यांचा निकाल लागला होता. तेथील यतिवर्यांनी पर्तगाळच्या या महोत्सवाला अपशकून करावा म्हणून नारायण नावाच्या भूतयोनीतील एका पिशाच्च्यास पर्तगाळीला जाऊन रथाची गति कुंठित करण्याची आज्ञा दिली.
ठरल्याप्रमाणे मोठ्या धुमधडाक्याने रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. शेवटच्या नवमीच्या दिवशी महारथ ओढण्यास लोकांनी सुरुवात केली. काही अंतर गेल्यावर रथाची गति कुंठित झाली.
कुणीतरी दिग्विजयरामचंद्रतीर्थांना मठात जाऊन ही वार्ता सांगितली. अंतर्ज्ञानाने काय झाले असावे याची त्यांना कल्पना आली. त्यांनी जवळचा एक नारळ हातात घेऊन मंत्रसामर्थ्याने नारायण भूतास त्या नारळात विलीन होण्यास भाग पाडले. हा नारळ आचार्यांनी राममंदिरासमोर असलेल्या मुख्यप्राण - मारुतीच्या पायांजवळ स्तंभित केला. आजही तो तिथेच गाडून राहिला आहे. हे विघ्न नष्ट केल्यावर रथ पुन्हा चालू लागला आणि सर्व उत्सव सुरळीतपणे पार पडला.
तेव्हापासुन अशिवहिवाट सुरु झाली की महारथ मुख्यप्राणाच्या घुडाजवळ येताच तेलाने भिजवलेली दोन लांबलचक् वस्त्रे घुडावरुन खाली सोडुन जाळतात. लोकानि अपर्ण केलेली वस्त्रेही अशाच प्रकारे जाळली जातात. शिवाय त्या भूतराजास नारळाचाही मान देतात. श्री रामदेवाची पालखी सुद्धा मुख्यप्राणाच्या घुडाजवळ आली म्हणजे असा नारळ भुतराजास वाहीला जातो.
रामनवमि उत्सवाची अशी व्यवस्था लावुन आणी तो साग्रसंगीत पार पडून आचार्य पुन्हा रिवण मठात गेले. तिथे मारुति रायाच्या उपासनेत काही काळ घालवून आचार्य मग अंकोले येथे गेले. तिथेच श्रीशके १५९० कीलक संवत्सर माघ वद्य नवमी त्यानि समाधि घेतली.
येन वाते: पदोर्मूले भूतो नारयणाभिधः ।
स्तब्धिकृतो दिग्विजयरामचन्द्रगुरुं भजे ।