दीक्षागुरु : श्री दिग्विजयरामचंद्र तीर्थ (७)
शिष्यस्वीकार : श्री लक्ष्मीनारायण तीर्थ (९)
महानिर्वाण : श्रीशके १६०४ दुंदुभी संवत्सर पुष्य शुक्ल १५ बुधवार (१३-०१-१६८३)
वृंदावन स्थळ : श्री राममंदिर होन्नावर
गुरुपीठकालावधी : १३ वर्षे १० महिने १९ दिवस
श्रीमद् रघुचंद्रतीर्थ हे परंपरेतील ८ वे आचार्य असून दिग्विजयरामचंद्रतीर्थानी त्यांना आश्रम दिला. यांनी आपले कायम निवासस्थान पर्तगाळी मठात न करता ते गोकर्ण मठातच बहुतेक काळ घालवू लागले. त्यानी खूप तीर्थयात्रा केल्याचा उल्लेख आहे.
मध्वाचार्यांनी उडुपी क्षेत्रात अष्टमठ स्थापन केले, त्यांचे अनुकरण करून पर्तगाळी मंठांत आपणही अष्टमठ स्थापन करावे अशी कल्पना त्यांस सुचली. त्याप्रमाणे गोकर्ण येथे आठ ब्रह्मचारी निवडून त्यांस प्रायश्चित्तादि विधिविधाने करवून तीन शिष्यांस आश्रमही दिला. इतक्यात त्यांतील एक शिष्य पंचत्व पावला. नंतर चौथ्या शिष्यास आश्रम दिला. तोही निधन पावला. हे अघटित पाहून श्रीमद् रघुचंद्रतीर्थांस धक्काच बसला. हे असे का होत आहे हे त्यांना कळेना. ते अत्यंत खिन्न झाले. अशा मनोवस्थेत असतांना त्यांस दृष्टांत झाला. 'मध्वाचार्यांनी अष्ठमठस्थापनेचे महान् कार्य केले त्याचे अनुकरण करणे योग्य नव्हे. ते इतरांकडून होणे नाही. म्हणून हा विचार मनातून काढून टाका.'' या दृष्टांतानुसार त्यांनी अष्ठमठस्थापनेचा आपला संकल्प सोडून दिला.
अनेक शिष्यांपैकी जे विद्यमान राहिले ते श्रीमद् लक्ष्मीनारायण तीर्थ, व्यासतीर्थ व संयमींद्रतीर्थ हे होत. या तीन शिष्यांपैकी मठाचे उत्तराधिकारी म्हणून कोणास नियुक्त करावे असा श्री रघुचंद्रतीर्थापुढे पेच पडला. तिघेही सारखेच विव्दान व अधिकारी होते. रागलोभादि षड्रिपूवर विजय मिळवण्याची साधना करीत असले तरी अखेर ते मानवच होते. शेवटी शिष्यांनीच यातून मार्ग काढला. संयमींद्रतीर्थ काशीस जाऊन राहिले. व्यासतीर्थांनी उत्तराधिकारावर आपण होऊन पाणी सोडले व सर्व प्रकारची विरक्ती स्वीकारून श्रीरामदेवाच्या उपासनेला त्यांनी वाहून घेतले. पुढे पर्तगाळ मठातच त्याचे निर्वाण झाले. पट्टाभिषेक न होता शिष्याश्रमात असतानाच निर्वाणप्रत गेलेल्या फक्त दोनच यतीची नांवें मठाच्या इतिहासात नमूद आहेत. त्यापैकी व्यासतीर्थ हे पहिले आणि २० व्या परंपरेचे श्रीइंदिराकांततीर्थ यांचे शिष्य नरहरीतीर्थ हे दुसरे. या दोघांचीही वृंदावने पर्तगाळी मठातील यज्ञशाळेच्या मागच्या बाजूस म्हणजे पूर्व दिशेस चौकीवर आहेत.
यात राहिले श्रीलक्ष्मीनारायणतीर्थ. त्यांच्याकडे मुद्रा, पादुका श्री रामदेव वीरविठ्ठलाची विग्रहे, धर्माध्यक्षपदाचा मान व मठाचा सर्व कारभार सोपवून गुरु श्रीरघुचंद्रतीर्थस्वामी होन्नावर मठात निघून गेले.
श्रीरघुचंद्रतीर्थांनी आपल्या अल्प कारकीर्दीत तीन वेळा गंगायात्रा केली असल्याचा उल्लेख सापडतो. श्रीरघुचंद्रतीर्थ तीर्थयात्रेस गेले असताना त्यांनी काशीतील बिंदुमाधव गल्लीत असलेल्या संस्थानच्या आद्यमठाची डागडुजी केली. मठ प्राचीन असला तरी त्याची जमीनविषयक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. म्हणून तारीख (रमजान)१७ माहे सन १०६९ रोजि स्थानिक सत्तेच्या आदेशाने जमीन विकत घेण्याचा करार केला. त्या दिवशी जागेसह घराची किंमत रु. १०२५ ठरली व विसारा म्हणून निम्मी रक्कम श्री रघुचंद्र तीर्थांनी लक्ष्मणदास वलद विट्टलदास ईबन कासिदास व उपाध्ये गोवर्धनदास बिन राया ओपाध्य व अध्य उपाध्य यांना दिली. हा करार काशीच्या काजीकडे नोंदवला असून त्यावर साक्षिदारांच्या सह्या आहेत.
श्री रघुचंद्र तीर्थांनी शके १६०४ दुंदुभी संवत्सर पौष्य पुर्णिमेला होन्नावरांत समाधी घेतली. श्री राम मंदिरात त्यांची समाधि आहे.
स्नष्टुमष्टौ मठान्येन महान्यलः कृतोऽपि सः ।
विष्णुना चोदितस्त्यत्को रघुचन्द्रगुरुं भने ॥