श्रीमद् लक्ष्मीनारायण तीर्थ
दीक्षागुरु : श्री रघुचंद्रतीर्थ (८)
गुरुपीठारोहण :
शिष्यस्वीकार : श्री लक्ष्मीकांत तीर्थ (१०)
महानिर्वाण : श्री शके १६२४ चित्रभानु संवत्सर फाल्गुन वद्य ७ शुक्रवार (०९-०३-१७०३)
वृंदावन स्थळ : नासीक गोदावरी तीरे (सांकेतिक, नासीक मठांत)
महानकार्य : वारणाशी मठाचा प्रथम विस्थारित जीर्णोद्धार
श्रीलक्ष्मीनारायणतीर्थ हे नवव्या परंपरेचे आचार्य व श्रीरघुचंद्रतीर्थांचे शिष्य. श्री रघुचंद्रतीर्थांच्या अष्ठमठ स्थापनेच्या प्रयत्नांचा उल्लेख आलाच आहे. विद्यमान असलेल्या त्यांच्या तीन शिष्यापैकी ज्यांच्या हाती आचार्य पीठाची सूत्रे आली ते हे श्रीमद् लक्ष्मीनारायणतीर्थ.
श्रीमद् लक्ष्मीनारायणतीर्थांनी पर्तगाळ मठात शिष्यस्वीकार करून त्यांस आश्रम दिला व त्यांचे लक्ष्मीकांततीर्थ असे नामकरण केले.
या आचार्यांनी मठाचा कारभार चांगल्या प्रकारे करून मठाचे उत्पन्न वाढविले. जमिनी दान घेतल्या, विकत घेतल्या, ठिकठिकाणी आसलेल्या मठांचा जीर्णोद्धार केला. शीष्य स्वीकार केल्यावर ते यात्रा करून आल्याचा उल्लेख मिळतो. धनुष्कोडि, तिरुपती वगैरे पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेऊन ते वेणुपुरास (नगर) आले. तीथल्या चन्नम्मा या केळदी राज्याचा राणीने त्यांचा आदर सत्कार केला व ब्राह्मणा कडून त्यांची पाद्यपूजा करून व पांच दिवस ठेवून त्यांस श्वेतछत्र, चामरे, दीपीका, शंख व शिबिका वगैरे देऊन मान केला. मग बसरूर, भटकळ, मार्गे गोकर्णात आले.
पुन्हा एकदा आचार्य तीर्थयात्रेला गेले ते उत्तरेला काशीक्षेत्री जाऊन भागीरथीत स्नान करून व बिंदुमाधवाचे दर्शन घेऊन गोदातीरी आले. व तिथेच कांही काळ त्यांनी निवास केला. शके १६२४ चित्रभानु संवत्सर फाल्गुन कृष्ण ७ या दिवशी गोदातीरावरच ते निर्वाणाप्रत झाले.
प्राप्तपत्रार्जुनच्छत्रशंखचामरदीपिकम् ।
भुयोभुयो भजे भक्त्या लक्ष्मीनारायणं गुरुम् ॥